लोकप्रतिनिधींनी समाजामध्ये एकोपा निर्माण करायचा असतो, मात्र शिवसेना खासदार संजय राऊत जैन समाजाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करत आहेत, अशी भावना सकल जैन समाजात निर्माण होताना दिसते. औरंगाबादमधील सकल जैन समाजाने शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे यासंदर्भात खंत व्यक्त केली. त्यांच्याकडून राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी राऊत यांनी भाजपने जैन मुनींच्या मदतीने जातीच्या आधारावर मते मागितली, असा आरोप केला. राऊत यांनी जैन समाजाचा अपमान केला असल्याचं सकल जैन समाजानं म्हटलं आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. ‘मनी’ आणि ‘मुनी’च्या जोरावर भाजपने मिरा-भाईंदर जिंकले, असं ते म्हणाले. राऊत यांच्या या वक्तव्याचा आज औरंगाबाद येथील जैन समाजाकडून निषेध करण्यात आला. या संदर्भात त्यानी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांनी आपली बाजू राज्य सरकरपर्यंत पोहोचवण्याची विनंती त्यांनी केली. मिरा-भाईंदरमध्ये भाजपला विजयी करा, असे सांगणाऱ्या एका जैन मुनींची व्हिडिओ क्लिप निवडणुकीपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये संबंधित जैन मुनींनी पर्युषण पर्वातील मांसाहार सेवनाच्या मुद्द्यावर भाष्य केले होते.