कचऱ्यामुळे त्वचारोग वाढले; औरंगाबादमधील नारेगाववासीय संतप्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भर दुपारची वेळ, बारा वाजले असावेत. औरंगाबादचा कचरा भरून आलेल्या गाडय़ा कचऱ्याच्या डोंगरातून वाट काढत पुढे जात होत्या. दीडशे गाडय़ांतून येणारा ३५० ते ४०० टन कचरा. गेल्या तीस वर्षांपासून ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे. त्याचा डोंगर नीट रचला जावा म्हणून एक जेसीबी सतत एक बाजू उकरत होता. काही कचरावेचक मेनकापड, काच वेगळी करून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले. पावासामुळे कचऱ्याची दलदल झालेली. भोवताली माश्या घोंघावणाऱ्या. अशा वातावरणात राहणारे नारेगावचे रहिवाशी म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे, ‘कचरा साफ करा. आमचे म्हणणे तेवढेच आहे. आमच्या गावातील कचराही साफ करा.’ भाजप सत्तेत आल्यानंतर महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत उपक्रमात झाडू घेऊन रस्ता साफ करतानाचे छायाचित्र काढून घेणारी माणसे ना या भागात फिरकतात, ना काही धोरणात्मक उपाययोजना करतात. परिणामी नारेगावातील अनेकांना त्वचारोग जडले आहेत. श्वसनाचे विकारही घरोघरी.

नारेगावच्या कचरा डेपोच्या शेजारी अमिनाबी खान यांचे घर. चार कुटुंबे एकाच इमारतीमध्ये राहणारी. आठ लहान मुले. सतत आजारी पडणारी. त्या सांगत होत्या, ‘सतत कोणी तरी आजारी पडते. कारण माश्या आणि डास यामुळे थंडी-ताप हे आजार नेहमीचेच. अमिनाबाई म्हणतात, कचरा नसता तर चांगले जगता आले असते.’ कचऱ्याभोवती आयुष्य काढणारे अनेक कुटुंबे. नबी शाह ३० वर्षांपासून कचऱ्याच्या निगराणीचे काम करतात. तन्वीर खान त्यांचे निरीक्षक. ते सांगत होते, अजून मला काही झाले नाही. पण एवढे दिवस कचऱ्याच्या किती गाडय़ा येतात याचे मोजमाप करण्यात गेले. त्या अस्वच्छतेचा परिणाम तर होईलच ना! कचऱ्याची विल्हेवाट न लावल्याने आता आरोग्याचे प्रश्न वाढत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सरासरी बाह्य़रुग्णांची संख्या शंभराहून अधिक. डॉ. अर्चना राणे म्हणाल्या, ‘कचरा डपोमुळे त्वचारोगी जास्त असतात. अस्वच्छतेमुळे होणारे रोग या भागात आहेतच. कचरावेचकांची संख्या अधिक असल्याने त्यांना त्वचाविकारही जडतात.’

एवढा कचरा झाल्याने नारेगावमध्ये कुत्र्यांची संख्या कमालीची वाढलेली. ३०० हून अधिक श्वान. त्यामुळे दररोज २० जणांवर अ‍ॅन्टीरॅबीजचे उपचार करावे लागतात. पण शहरातील व्यक्तींनी कचरा बाहेर टाकला की, त्यांचे काम झाले. महापालिकेच्या स्तरावर कचरा गोळा करून तो एखाद्या ठिकाणी आणून टाकला की आपले काम झाले, असे प्रशासनही मानते परिणामी राज्यभर कचऱ्याच्या भोवतालची गावे हैराण आहेत. कचऱ्याची समस्या नष्ट व्हावी म्हणून काम करणाऱ्या नताशा झरीन सांगत होत्या, ‘कचरा नष्ट करण्यासाठी वेगवेगळया पद्धती वापरल्या जातात. बायोरिमेडिएशन आणि बायोमायनिंग या तंत्राच्या आधारे कचरा कमी करता येऊ शकतो. यातील यंत्र प्लास्टिक, माती आणि अन्य घटक वेगवेगळे करते. चौदा प्रकारचे घटक वेगळे केल्यानंतर त्याचा पुनर्वापर करता येतो. मात्र, त्यासाठी अधिक तरतूद लागते. या प्रकारचा प्रयोग औरंगाबाद महापालिकेने करण्याचा प्रयत्न केला.’

तीस फूट कचऱ्याचा ढीग

या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती प्रयोग करीत असल्या तरी कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष न देता केवळ ‘स्वच्छ भारत’ या शीर्षांखाली छायाचित्र प्रसिद्ध करण्याकडेच सत्ताधाऱ्यांचा कल आहे. परिणामी कचऱ्याचा डोंगर वाढतो आहे. औरंगाबादसारख्या शहरातील कचऱ्याचा ढीग आता ४६ एकरात ३० फूट उंचीवर गेला आहे. महापालिका प्रशासन अधून-मधून त्यावर चर्चा करते. उत्तर कोणी शोधत नाही. अमिनाबी आणि त्यांच्या परिवारातील व्यक्ती आजारी पडल्या तर त्यांना पालिकेचा दवाखाना उपलब्ध आहे ना, अशा मानसिकतेमध्ये शासन आणि प्रशासन असल्यामुळे समस्या सुटत नाहीत, असे या क्षेत्रातील कार्यकर्ते सांगतात. दोन दिवसांपूर्वी आमच्या गावात कचरा टाकू नका, अशी भूमिका नारेगावमधील नागरिकांनी घेतली. त्यांना पुन्हा समजावून सांगण्यात आले आणि बुधवारी पुन्हा महापालिकेच्या दीडशे गाडय़ा कचऱ्यासह नारेगावच्या कचराडेपोमध्ये चिखलातून वाट काढत घुसल्या. कचऱ्याच्या डोंगरावर पुन्हा ३५० टन कचरा टाकला गेला. गाडय़ांची नोंद झाली आणि तन्वीर खान यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of garbage management in aurangabad
First published on: 28-09-2017 at 02:29 IST