राज्य विधानपरिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात असून, उद्या, शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून, निवडणूक निरीक्षक संतोष पाटील मागील अनेक दिवसांपासून नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत.

मागील वेळेसची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली होती. या वेळी काँग्रेसच्या वतीने निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु खा. चव्हाणांचे कट्टर राजकीय विरोधक आ. चिखलीकर यांनी त्यांचे मेहुणे व माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर िशदे यांना मदानात उतरवल्यामुळे काँग्रेसच्या या प्रयत्नाला खो बसला. िशदे यांना भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने पािठबा दिल्यामुळे ही लढत तुल्यबळ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेसकडे बहुमत असले तरी त्यांचे मतदार फोडण्याची क्षमता विरोधकांकडे असल्याने काँग्रेसनेही सावध पाऊल उचलले आहे. सध्या दोन्ही पक्षांचे मतदार सहलीवर असून उद्या थेट मतदान केंद्रावरच दाखल होतील, अशी व्यवस्था उमेदवारांकडून करण्यात आली आहे.

महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व निलंबित नगरसेवक उमेश पवळे यांनी त्यांच्या निलंबनाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती आणली असून, आपल्याला मतदान करू द्यावे, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासंदर्भातील निर्णय उद्यापर्यंत अपेक्षित आहे.

मतदानासाठी निवडणूक विभागाने आवश्यक ती सिद्धता केली आहे. शुक्रवारी मतदान केंद्रावरील पथके आवश्यक संपूर्ण सामग्रीसह रवाना होणार आहेत.

मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी चोख बंदोबस्त मतदान केंद्रावर लावण्यात येणार असून, मतदान केंद्रात व केंद्राच्या बाहेर परिसरात असे दोन व्हिडिओ कॅमेरे चित्रीकरण करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. आठही मतदान केंद्रावर शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान करता येणार असून, मतदाराला स्वत:सोबत ओळखपत्राशिवाय अन्य कोणतीही वस्तू बाळगता येणार नाही. भ्रमणध्वनीचादेखील निषिद्ध वस्तूंमध्ये समावेश आहे. त्यामुळे उमेदवारांनाही मतदारांवर विश्वास ठेवण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही. प्रत्यक्ष मतमोजणी दि. २२ नोव्हेंबरला असल्याने सर्व मतपेटय़ा जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र बंदोबस्त २४ तास तनात राहणार असून, बचत भवनात आत आणि बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. २२ तारखेला सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.