परिसरातील पाच हजार एकरवरील पीक प्रभावित

औरंगाबाद : औरंगाबाद तालुक्यातील काही गावांमधील मका, बाजरी, कापूस, तूर आदी पिकांवर सध्या हिरव्या रंगाच्या नाकतोडय़ांनी हजारोंच्या संख्येने हल्ला चढवला आहे. या प्रकारामुळे परिसरातील सुमारे पाच-सात हजार एकरवरील पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतित झाले आहेत. शेतकरी याला टोळधाड म्हणत आहेत, तर कृषी विभाग हा टोळधाडीचा प्रकार नसल्याचे सांगत आहे.

औरंगाबादपासून जवळच असलेल्या बीड  रोडवरील झाल्टा, गांधेली, आडगाव, निपाणी, चिंचोली, परदरी, एकोड, पाचोड, टाकळी आदी गावातील मका, कडूळ, बाजरी पिके धोक्यात आली आहेत. आडगाव येथील शेतकरी गणेश हाके यांनी सांगितले की, गावात व नजीकच्या परिसरात  साधारण मका पीक ५०० एकरवर, कडूळ १०० ते दीडशे एकर, बाजरी सुमारे एक हजार एकरवर आहे. या पिकांवर सध्या हिरव्या लहान-लहान आकाराच्या नाकतोडय़ांनी हल्ला चढवला आहे. पिके, पाने कुरतडून टाकत आहेत. पावसामुळे जिथे जादा गवत आलेले आहे त्याच्या नजीकच्या शेतातील पिकांवर नाकतोडय़ांचा हल्ला होत आहे.

मोहोळ उठावे तसे हे नाकतोडे एका पिकावरून दुसऱ्या पिकावर जाऊन बसत असून त्यातून मका, बाजरी, कडुळाची पाने कुरतडून टाकत आहेत. साधारण सरळ पानाच्या पिकांवर हे नाकतोडे जाऊन बसत आहेत. गावात अद्याप कापूस, तुरीवर नाकतोडय़ांनी मोर्चा वळवला नाही. कृषी विभागाचे अधिकारी फवारणी करण्याचा सल्ला देत आहेत. रविवारी दुपारनंतर कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाहणीही केली.

निपाणी येथील ग्रामपंचायत सदस्य प्रभू भालेकर म्हणाले, गावात ७०० ते ८०० हेक्टरवरील शेतीचे क्षेत्र असून त्यातील ८० ते ८५ टक्के परिसरातील पिके टोळधाडीने धोक्यात आली आहेत.

दहा ते बारा पाने असलेल्या पिकांना आता दोन ते तीनच पाने शिल्लक राहिली आहेत. गावातील मूग, बाजरी, कापसाच्याही पिकांवर नाकतोडे मोठय़ा संख्येने हल्ला चढवत आहेत.

नाकतोडय़ांचा पिकांवर हल्ला

गावातील कडूळ, बाजरी, मक्यावर नाकतोडे हल्ला चढवून पिके फस्त करत आहेत. टोळधाडीचाच हा प्रकार आहे. दोन वर्षांपूर्वीही असे घडले होते. मात्र, तेव्हा संख्या फार कमी होती. आता हजारोंच्या संख्येने नाकतोडे पिकांवर दिसत आहेत. आपल्या शेतातील पीक सध्या नाकतोडय़ांमुळे धोक्यात आले आहे.

– विश्वंभर हाके, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा शेतकरी संघटनेचे नेते.

टोळधाडीचा प्रकार नाही

ज्या गावातील पिकांवर नाकतोडय़ांनी हल्ला चढवला आहे तेथील आम्ही पाहणी करणार आहोत. लहान आकारातील नाकतोडे मोठय़ा संख्येने असल्याचे भासतात. हा प्रकार टोळधाडीचा नाही. शेतकऱ्यांनी भीती बाळगू नये.

– डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.