औरंगाबाद : ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धे’त औरंगाबाद विभागातून सरस्वती भुवन कला महाविद्यालयाच्या ‘काळोखाचा रंग कोणता’ या एकांकिकेची महाअंतिम फेरीसाठी निवड झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़ शास्त्र विभागाची ‘कसरत’ ही दुसरी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्याच ललित कला विभागाची ‘रक्षक’ ही एकांकिका तृतीय ठरली.

मंगळवारी सायंकाळी परीक्षक तथा रंगभूमीचे अभ्यासक डॉ. अजय जोशी आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रतिभा दाते यांनी या संदर्भातील निकाल जाहीर केले. परीक्षक आणि इंडियन एक्स्प्रेसच्या जाहिरात विभागाचे उपमहाव्यवस्थापक मुर्गेश मुदलीयार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम, द्वितीय व तृतीय एकांकिका, दिग्दर्शक, अभिनय पुरुष व स्त्री पात्र, संगीत, नेपथ्यकार व प्रकाश योजनेसाठी पारितोषिके देण्यात आली.

‘काळोखाचा रंग कोणता’ने सर्वोत्कृष्ट एकांकिकेसह, दिग्दर्शन, अभिनय पुरुष आणि स्त्री पात्र, यामध्येही बाजी मारली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  डिक्कर, सर्वोत्कृष्ट अभियन जगदीश कन्नम, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी दुर्गेश्वरी अंभोरे यांना गौरवण्यात आले. ‘कसरत’ने सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट संगीत व सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठीचे पारितोषिक पटकावले. सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार सौरभ किंगराणी आणि रोहन गहिरे तर सर्वोत्कृष्ट संगीतासाठी ऋषिकेश गोल्हार व सौरभ पद्माकर आणि सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठीचे पारितोषिक कसरतच्या नितीन रसाळ याने पटकावले.

एकांकिकांच्या सादरीकरणात तंत्राच्या आहारी न जाता वाचिक अभियनयाच्या आधारे तुमची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचेल, यासाठी मेहनत घ्यावी. रंगकर्मीनी त्या स्पर्धेचाही दर्जा वाढेल, याकडेही लक्ष द्यावे.

– प्रतिभा दाते, परीक्षक

या स्पर्धेकडे महाविद्यालयीन तरुण रंगकर्मीनी प्रयोगशाळा म्हणून पाहावे. यातूनच तुमच्यात व्यावसायिक रंगभूमीवरील मंचावर सादरीकरणाचा विश्वास निर्माण होईल. कलाकारांनी रंगमंच व्यवस्थापन शिकणे महत्त्वाचे असून संहिता, पात्राशी समरस होता आले पाहिजे.

– डॉ. अजय जोशी, परीक्षक