23 November 2017

News Flash

महापौरांना लाल दिवा मिळावा, खासदार चंद्रकांत खैरेंची मागणी

तुलनेनं महापौर यांना अधिकार नाहीत

औरंगाबाद | Updated: September 9, 2017 2:33 PM

प्रातिनिधीक छायाचित्र

औरंगाबाद शहरात १०९ व्या अखिल भारतीय महापौर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दोन दिवसीय महापौर परिषदेला शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. महापौरांना आर्थिक अधिकार मिळायला हवेत. तसेच दिल्ली येथील महाराष्ट्र सदन आणि काही ठिकाणी आरक्षण मिळायला हवं, असं मत औरंगाबादचे महापौर भगवान घडामोडे यांनी सर्व महापौरांच्या वतीनं व्यक्त केलं. शहराचा विकास करण्याची जबाबदारी महापौर यांच्यावर असते. मात्र त्या तुलनेनं महापौर यांना अधिकार नाहीत. आयुक्त आणि महापौर यांच्यात बिनसलं तर, विकासाला खीळ बसते. त्यामुळे गतिमान विकास होण्यासाठी आर्थिक अधिकारात वाढ करावी, असं मत भगवान घोडामोडे यांनी व्यक्त केलं.

महापौरांना अन्य अधिकारही मिळायला हवेत त्यामुळे नोकरशाहीवर अंकुश राहील. शासकीय विश्राम गृह दिल्ली येथील महाराष्ट्र सदन याठिकाणी आरक्षित जागा मिळावी असंही घडामोडे यावेळी म्हणाले. भगवान घडमोडे यांच्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनीही महापौर यांच्या अधिकारावर भाष्य केलं. महापौरांना आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार मिळायला हवे असं मत त्यांनी मांडलं. महापालिका हे सर्वोच्च सभागृह आहे. त्यामुळे महापौर यांचे अधिकार वाढायला हवेत असं खैरे म्हणाले. महापौरांना लाल दिवा मिळावा, अशी मागणी देखील खैरे यांनी केली. महापौर आले की नाही हे कळत नाही. त्यांच्या गाडी समोर पाटी लावावी लागते. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी लाल दिवा परत द्यावा, असे खैरे म्हणाले.

First Published on September 9, 2017 2:31 pm

Web Title: mayor seeks red light mp chandrakant khairje demands