नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करत ख्यातनाम धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय दूरगामी तसेच सकारात्मक परिणाम देणारा असल्याचा आशावाद जागवला. मोदी यांच्या शेजारच्या राष्ट्रांसह अनेक देशांपुढे मैत्रीसाठी हात पुढे करणाऱ्या गुणाचेही येथे त्यांनी गुणगान केले. मातृभाषा, राष्ट्रभाषेचा अभिमान बाळगण्यात संकोच करू नका, असे सांगून माझ्या नावाने अ‍ॅथलेटिक्स अ‍ॅकॅडमी स्थापन करून औरंगाबादेतून अनेक मिल्खा सिंग देशाला मिळावेत, अशी अपेक्षाही सिंग यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अ‍ॅथलेटिक्स मैदानावर रिव्हरडेल हायस्कूल आयोजित वार्षिक कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर रमेशभाई पटेल, डॉ. मित्तल, उपप्राचार्य चव्हाण, मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. मकरंद जोशी, सुरेंद्र मोदी, माउंट एव्हरेस्ट वीर रफीक ताहेर, डॉ. प्रदीप दुबे, मनीषा वाघमारे, श्रीनिवास तांबे आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

हाथ की लकीरों से जिंदगी नहीं बनती,

अजम हमारा भी हिस्सा है जिंदगी बनाने में

या शेरने सुरुवात करत मिल्खा सिंग यांनी बराक ओबामा, नरेंद्र मोदी या साधारण घरातून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तींचे उदाहरण दिले. मोदी यांच्या अनेक देशांना देण्यात येणाऱ्या भेटीचे, त्यातून मैत्रीसाठी पुढे करण्यात येणाऱ्या प्रयत्नाचे कौतुक करत सगळे काही एका रात्रीत बदलेल, ही अपेक्षा ठेवून चालणार नाही. बेकारी, गरिबी समूळ दूर होणार नाही, पण मोदी काहीतरी प्रयत्न करीत आहेत, असे सांगितले. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी राष्ट्रभाषेतूनच बोलण्याला प्राधान्य देत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, ‘मिल्खा सिंग’ चित्रपटाने जगण्याची ऊर्मी मिळाली, आता ही ऊर्जा तरुणांना प्रेरणा देण्यासाठी वापरतो. औरंगाबादेतून अनेक मिल्खा सिंग घडावेत आणि पुन्हा एकदा येथे येण्याची संधी मिळावी.

फाळणीच्या आठवणी ताज्या

तोफा, बंदुकीच्या लढाईतून काहीच निष्पन्न होत नाही, त्यापेक्षा मैत्रीचा हात केव्हाही चांगला, असे सांगताना त्यामागे सिंग यांचे मन भारत-पाकिस्तानची फाळणी झाली, तेव्हा घडलेल्या नृशंस हत्येच्या जखमांनी आजही भरले असल्याची जाणीव उपस्थितांना झाली.