News Flash

हैदराबाद मुक्तिदिनाच्या ध्वजारोहणास आमदार जलील यांची पुन्हा गैरहजेरी

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा हा संघर्षांचा होता. रझाकारांबरोबर अनेकांना अक्षरश: लढावे लागले होते.

आमदार इम्तियाज जलील

औरंगाबाद : हैदराबाद मुक्तिदिनानिमित्त होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण समारोहास गैरहजर राहण्याचा शिरस्ता एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी या वर्षीही कायम ठेवला. हैदराबाद संस्थानातील रझाकारांची संघटना म्हणून ‘मजलिस’ची मुख्य भूमिका होती. मात्र, ती मजलिस आणि एमआयएम हा पक्ष याचा परस्पर संबंध नाही, असा दावा या पक्षाच्या प्रमुखांनी वारंवार व्यक्त केलेला आहे. तरीही हैदराबाद मुक्तीदिनाच्या ध्वजारोहण समारंभास एमआयएमचे आमदार गैरहजर असतात, असे दिसून आले आहे. गेल्या वर्षी या कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्या जलील यांनी गैरहजेरीचे कोणतेही वाईट अर्थ लावू नये, असे म्हटले होते. मात्र, या वर्षी पुन्हा ते या कार्यक्रमास हजर नव्हते. या अनुषंगाने त्यांना विचारले असता ‘मी धुळ्याला गेलो होतो. त्यामुळे समारंभास पोहोचू शकलो नाही,’ असे आमदार जलील म्हणाले.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा हा संघर्षांचा होता. रझाकारांबरोबर अनेकांना अक्षरश: लढावे लागले होते.

सशस्त्र लढय़ाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अ‍ॅक्शननंतर हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ साली मुक्त झाले. यात तेलंगणा आणि मराठवाडय़ाचा मोठा भूभाग होता. त्याची आठवण म्हणून दरवर्षी १७ सप्टेंबरला औरंगाबाद येथे तिरंगा ध्वज फडकवला जातो. ध्वजारोहणाच्या या कार्यक्रमास खास मुख्यमंत्री येतात. मात्र, गेल्या काही वर्षांतील कार्यक्रमांना एमआयएमचे आमदार जलील यांनी हजेरी लावली नाही. या विषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अनुषंगाने बोलताना भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले, ‘सर्व लोकप्रतिनिधींना हजर राहणे आवश्यक असते. सातत्याने ते का गैरहजर राहतात, हे त्यांना विचारायला हवे.’ दरम्यान, मराठवाडय़ातल्या काही जिल्ह्य़ांमध्ये लोकप्रतिनिधींनी ध्वजारोहणास हजेरी लावली नसल्याचेही वृत्त आहे. यात लातूरच्या नगरसेवकांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 3:34 am

Web Title: mla imtiyaz jaleel absent on flag hosting in marathwada mukti sangram day
Next Stories
1 बँकांमध्ये अनियमिततांचा खेळ
2 प्रत्येक मतदार संघात जाऊन भाजपाविरोधात जनजागरण करणार – काँग्रेस
3 मराठवाड्यात ११ हजार कोटींची गुंतवणूक आणि तीन लाख रोजगार निर्मिती होणार – मुख्यमंत्री