12 December 2017

News Flash

मोदींनी जेएनयू अध्यक्षपदाची निवडणूक लढवून दाखवावी

कन्हैयाकुमार म्हणाला, मोदी सरकारने शैक्षणिक संस्थांना उद्ध्वस्त करण्याची नीती आखली आहे.

प्रतिनिधी, औरंगाबाद | Updated: August 8, 2017 3:03 AM

‘तिहार से बिहारतक’ या मराठी अनुवादाच्या प्रकाशनसमयी  प्रो. सुधाकर शेंडगे, डॉ. भालचंद्र कानगो, कन्हैयाकुमार, गणेश विसपुते, प्रा. कैलास अंबुरे उपस्थित होते.

विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारच्या भाषणात पंतप्रधानच लक्ष्य

पंतप्रधान मोदी हे अपराजित आहेत. त्यांना कोणीही हरवू करू शकत नाही, अशी मानसिकता तयार केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतर निवडणुका लढवण्यापेक्षा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी सभेची निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान देताना विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याने पंतप्रधान मोदी हे व्यक्तिगत, सामाजिक व पारिवारिक या तिन्ही पातळ्यांवर अयशस्वी ठरल्याची टीका केली.

निश्चलनीकरणाचा निर्णय फसलेला असून त्यामुळे दहशतवाद तर कमी झालाच नाही, उलट देशात १५ लाख लोक बेरोजगार झालेले असताना त्याचे मोजमाप न करता देशभक्ती मोजली जात आहे, आत्महत्या करणारे अधिक शेतकरी हे हिंदू धर्माचे असतानाही त्याबद्दल हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्यांना काहीही कसे वाटत नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आपल्या दीड तासाच्या संवादात कन्हैयाकुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच टीकेच्या केंद्रस्थानी ठेवले होते. मात्र आज देशात कुठला लोकनेता आहे, या प्रश्नावर मोदी यांचे निर्णय चुकलेले असताना त्यांच्या प्रतिमेचे जनमानसावर गारुड असल्याचेही सांगताना महाभारतात अर्जुनाचे सारथ्य कृष्णाने केले पण या भारतात मोदींचा विजयी रथ हा कन्हैयाकुमार रोखेल, असेही तो म्हणाला.

येथील तापडिया नाटय़गृहात सोमवारी सकाळी ‘तिहार से बिहारतक’ या आत्मकथनाच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन व मुक्त संवाद, या आयोजित कार्यक्रमात कन्हैयाकुमार बोलत होता. कन्हैयाकुमारच्या कार्यक्रमासाठी दीडशे पोलिसांचा बंदोबस्त होता आणि निमंत्रकांसाठी पासची व्यवस्था करून संभाव्य व्यत्ययाबाबत खबरदारी आयोजकांकडून घेण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भालचंद्र कानगो होते. मंचावर पुस्तकाचे अनुवादक प्रो. सुधाकर शेंडगे, गणेश विसपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

कन्हैयाकुमार म्हणाला, मोदी सरकारने शैक्षणिक संस्थांना उद्ध्वस्त करण्याची नीती आखली आहे. विद्यापीठांवर हल्ले केले जात आहेत. ज्यांची योग्यता विभागप्रमुख होण्याचीही नाही, फेलोशिप इन्व्हेस्टमेंट कमिटीची तरतूद ९९ कोटी असताना ती बंद केली आहे.  त्यापेक्षा अधिक पैसा हा मोदींच्या विदेश दौऱ्यातील इंधनाचा झाला आहे. जेएनयू, हैदराबादच्या विद्यापीठाला देशद्रोही ठरवण्याचा घाट घातला जात आहे. त्यातून रोहित वेमुलासारख्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. सरकारचीच नीती कारणीभूत असल्याने भ्रष्टाचाराची कुठली नीती नाही तर नीतीमध्ये भ्रष्टाचार सामावलेला आहे.

यावेळी कन्हैयाकुमारने आपली कौटुंबिक माहिती सांगताना आपण एका स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबातील व्यक्ती असून परिवारातील १६ सदस्य हे सैन्यात आहेत, वडील शेतकरी तर आई अंगणवाडीत काम करत असल्यामुळे माझ्या देशप्रेमावर कोणी शंका घेऊ नये, असेही आवाहन केले.

First Published on August 8, 2017 3:03 am

Web Title: narendra modi jnu election kanhaiya kumar