सुधारित नागरिकत्व कायद्यावरून वाद; विद्यापीठाला छावणीचे स्वरूप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विरुद्ध आंबेडकरवादी-डाव्या संघटनांसह इतर काही पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकत्रे एकत्र आले. दोन्ही विचारांचे पदाधिकारी परस्परांमध्ये भिडले. सुमारे अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांचा जमाव प्रशासकीय इमारतीजवळ जमा झाला होता. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आल्याने विद्यापीठ परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी दुपारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सन्मान मार्च काढण्यात आला होता. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील महात्मा फुले यांचा पुतळा ते परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, असा त्यांचा मार्ग होता. मात्र यादरम्यान, काही आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी विद्यापीठात दाखल झाले आणि त्यांनी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांच्या सन्मान मोर्चास विरोध केला. हा सन्मान मार्ग विद्यापीठ व पोलिसांच्या परवानगीविना काढण्यात आल्याचा आरोप आंबेडकरवादी संघटनांकडून करण्यात आला. तर अभाविपच्या मदतीसाठी भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड, माजी उपमहापौर विजय औताडे, राजू शिंदे, शिवाजी दांडगे आदींनी धाव घेतली. त्यावरून दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आमने-सामने उभे राहिले. त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. अभाविपच्या हातातील संघटनेचे भगवे झेंडे व काही तिरंगा असलेले झेंडे आंबेडकरवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हिसकावून घेतले. त्यामुळे अवमान झाल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. खाली पडलेले झेंडे पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळल्याचेही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या दोन्ही संघटनांच्या वादामुळे विद्यापीठ परिसरात पोलिसांची दहा ते बारा वाहने दाखल झालेली होती. दंगा काबू पथक, दामिनी पथकासह इतरही मोठय़ा वाहनांद्वारे पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता.

अभाविपच्या सन्मान मार्चला विद्यापीठ व पोलिसांची परवानगी नव्हती. तरीही पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांनी आंदोलन केले. तरीही त्यांच्यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. केंद्रामध्ये भाजपचे सरकार असल्यामुळे अभाविपकडून मुजोरी केली जात आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विरोध दर्शवण्यासाठी सर्व आंबेडकरवादी व डाव्यांसह इतर विद्यार्थी संघटना एकत्र आल्या होत्या. – प्रकाश इंगळे, सचिन निकम,आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी

विद्यापीठाकडे रीतसर परवानगी मागितली होती. मात्र, विद्यापीठाकडून परवानगी नाकारल्याच्या संदर्भाने कळवण्यात आले नाही. समोरील गटातील संघटनांकडून आमच्या हातातील झेंडे हिसकावून घेण्यात आले. त्यावर तिरंगा होता. तिरंगा असलेल्या झेंडय़ांबाबत अवमानकारक कृत्य केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. – गोविंद देशपांडे, अभाविप, जिल्हा जनसंपर्क प्रमुख.