कोपर्डी येथील घटनेला एक वर्ष पूर्ण होत असूनही महाराष्ट्राच्या निर्भयाला न्याय मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनी जलतगती न्यायालयात खटला चालवण्याच आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर मुक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी औरंगाबादमध्ये दिली.

यावेळी शेतकरी कर्जमाफी, जनतेतून थेट सरपंचाची निवड या विषयावर तटकरे यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडली. कर्जमाफी बाबतची गोंधळाची परिस्थिती सरकारने संपवावी. शरद पवार यांनी देशाची कर्जमाफी एका आदेशात केली. राज्यात कर्जमाफी करताना सरकारला दोन तीन आदेश काढावे लागले. तरीही गोंधळाची स्थिती आहे. त्यामध्ये शिवसेनेची भूमिका दुट्टपी आहे. बँकासमोर ढोल वाजवून उपयोग नसून ढोल वाजवायचा तर मंत्र्यांच्या घरासमोर वाजवा, असेही ते म्हणाले. सत्तेत राहून शेतकरी हितासाठी काही करायचं नाही. दोन पक्षांमधील असलेला विसंवाद आहे. त्यामुळे विकास काम होत नाही असा आरोप तटकरे यांनी केला. कर्जमाफीच्या पहिल्या आदेशात दहा हजार रुपये मदतीचे आश्वासन देण्यात आले होते. पावसाने दडी मारल्यामुळे आता दुबार पेरणीच संकट येऊ शकते. त्यामुळे सरकारने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

जनतेमधून थेट सरपंच निवडीवरही त्यांनी आक्षेप नोंदवला. ग्रामीण विकासाचा खेळखंडोबा करण्याचे काम सरकार करत आहे. मुख्य प्रश्नापासून परावृत्त करण्यासाठी सरकारला अशी हुकी येते. या निर्णयाचा ग्रामीण विकासावर दूरगामी परिणाम होईल, अशी भविष्यवाणी देखील त्यांनी केली.