उपाययोजनांवरून राज्य सरकारवर शरद पवारांची टीका

शब्दच्छल करून दुष्काळाचे राजकारण करण्याची अजिबात इच्छा नाही. परिस्थिती गंभीर आहे. अनेक दुष्काळ बघितले आहेत. त्याच्यावर तातडीने उपाययोजनाही केलेल्या आहेत. दुष्काळसदृश वगैरे असे शब्द आले तर ते महत्त्वाचे नाही. सरसकटपणे सर्वाना मदत होईल अशा उपाययोजना करताना दुष्काळग्रस्त भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे, त्याचबरोबर त्यांना शिष्यवृत्ती देता येऊ शकते काय, याचा विचार करावा. दुष्काळाचे गांभीर्य समजून पुढील आठ-नऊ महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना, जनावरांना चारा अशा उपाययोजना गांभीर्याने कराव्यात, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  येथे केल्याआहेत.

टंचाईसदृश शब्द वापरणाऱ्यांनी राजकीय शब्दच्छल करू नये, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचे नाव न घेता केली होती. त्या अनुषंगाने बोलताना पवार यांनी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात, हे सांगितले.

उसाला पर्याय बीट

गेल्या काही वर्षांत ऊस पीक आणि दुष्काळ असे विरोधाभासी चित्र दिसते. त्यावरचे मत व्यक्त करताना पवार म्हणाले,की काही दिवसांपूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्यावतीने राज्यातील आठ-नऊ तज्ज्ञांबरोबर फ्रान्स, नेदरलँड, स्पेन, बेल्जियम या देशांचा दौरा केला. त्यात बीट उत्पादनापासून साखर कशी तयार होते, याची माहिती घेतली. उसाला लागणारे पाणी आणि बिटाला लागणारे पाणी यात अंतर आहे. शर्करांशही अधिक असल्याने ऊस कारखान्याच्या परिसरात येत्या काळात बीट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याची व्यवस्था करावी लागेल, असे ते म्हणाले. उजनीतून सोलापूरला पाणी मिळत असल्यामुळे तेथील उसाची चिंता नाही. मात्र, अन्य ठिकाणी पीक पद्धतीत बदल करायचा असल्यास हा पर्याय असू शकतो, असे ते म्हणाले. जलसंवर्धनाच्या सगळ्या कामांना आमचा पाठिंबा असेल. मात्र, जलयुक्त शिवारबाबत ऐकू येणारे सर्व अहवाल चिंताजनक आहेत. त्याकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहायला हवे.

अचाट कल्पना कशाला लढवता?

चारा उपलब्ध करून देण्यासाठी छावण्या असाव्यात की डेपो याविषयी चर्चा सुरू आहे. परदेशातूनही चारा मागवू असे सांगितले जात आहे. यावर पवार म्हणाले,की अगदी इंग्लंम्डमधून चारा मागवला तरी हरकत नाही. पण चारा काही विमानातून येत नसतो. बोटीने चारा आणण्यासाठी, चारा खरेदी करण्यासाठी कोणाला तरी पाठवावे लागेल. मग तो येईल. तोपर्यंत पाच-सहा महिने निघून जातील. हे असे अंमलबजावणीत येत नसते. युद्धपातळीवर काम करायचे असेल तर अशा अचाट कल्पना लढविण्याऐवजी दुष्काळ हाताळणाऱ्या काही सनदी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला तर बिघडत नाही. आपण सर्वज्ञ आहातच, पण इतरांशी चर्चा करायला काय हरकत आहे, असेही पवार तिरकसपणे म्हणाले.

त्यांचा संबंध फक्त अन्नाशी

त्यांचा फक्त अन्नाशी संबंध आहे. शेती, पाणी, पशुसंवर्धन यातले त्यांना फारसे कळत नसावे. त्यामुळे त्यांना दुष्काळाचे गांभीर्य नसल्याची टीका पवारांनी शिवसेनेवर केली.  शिवसेनेच्या व्यासपीठावर आता रामाची मूर्ती दिसत आहे. यावर बोलताना ते म्हणाले, आपण रामनाम कधी घेतो, हे तुम्हाला माहितच आहे. कर्जमाफीचा शेतकऱ्यांना आधार मिळाला नाही. शेवटपर्यंत कर्जमाफी पोहोचलेलीच नाही. ऑनलाईनची दुकाने थाटली गेली,मात्र त्याचा फायदा झाला नसल्याची टीका पवार यांनी केली.