इंधनबचतीची सवय जडावी तसेच नवीन ऊर्जास्रोतांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने सीएमआयएच्या वतीने मंगळवारी आयोजित केलेल्या ‘सूर्यकुंभ’ उपक्रमात सौरऊर्जेच्या आधारे एकाच वेळी ५ हजार ७६० विद्यार्थ्यांनी नूडल्स तयार केले. या उपक्रमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाईल, असा दावा आयोजकांनी केला.
शहरातील शाळांमधील मुलांनी सकाळीच एमआयटी महाविद्यालयाचे प्रांगण गाठले. नव्या उपक्रमात सहभागी होण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर होता. प्रत्येकाने ४० मिनिटांत सूर्यकुंभ तयार केला. त्यात नूडल्स शिजविण्याचे ठरले होते. प्रत्येक विद्यार्थ्यांस सूर्यशक्तीची प्रचीती यावी, म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सीएमआयचे मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले. उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह व प्रतिसाद लाभला. विविध शाळांतील ५ हजार ७६० विद्यार्थी रांगेत बसून सौरऊर्जेवर नूडल्स तयार करण्यात मग्न होते. ३३० स्वयंसेवकांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. स्वयंपाक घरात नूडल्स बनतात, हे विद्यार्थ्यांना माहीत होते. मात्र, केवळ सूर्यकिरणांनी स्वयंपाक करता येतो याची प्रचीती विद्यार्थ्यांना आली. या पूर्वी मुंबई येथेही असाच प्रयोग करण्यात आला. मात्र, त्या पेक्षाही अधिक विद्यार्थी संख्या सूर्यकुंभात सहभागी झाल्याने हा उपक्रम गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंदविला जाणार आहे.
मराठवाडय़ात सूर्यकिरणांचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे या भागात वेगाने ऊर्जा निर्माण होऊ शकते. सौरशक्तीपासून वीजनिमिर्तीचेही काही प्रयोग मराठवाडय़ात सुरू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी सहकारी साखर कारखान्यातर्फे २ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. सरकारकडूनही एक प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे.
मराठवाडा सौरशक्तीचे केंद्र बनावे, अशी उद्योगविश्वाची भावना सरकापर्यंत पोहोचावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा विकसित करण्यासाठी या उपक्रमाचा अधिक लाभ होईल, म्हणून हा उपक्रम हाती घेतल्याचे सीएमआयएच्या वतीने सांगण्यात आले.