भारतीय जनता पक्षाने बुधवारी (दि. ६) ३७व्या वर्षांत पदार्पण केले. केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या या पक्षाला आपल्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर व अन्य फुटकळ उपक्रमांखेरीज एकही विधायक-रचनात्मक कार्यक्रम घेता आला नाही. जिल्हाभरातील शिबिरांतून जेमतेम ५०० पिशव्या रक्त संकलित झाले.
जिल्हय़ात या पक्षाच्या जिल्हा (ग्रामीण) व महानगर या दोन्ही शाखा नव्या कार्यकारिणीसह कार्यरत झाल्या आहेत. मधल्या काळात महानगर कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पक्षातील मुद्दय़ावरचा वाद भररस्त्यात गुद्दय़ावर उतरला तरी पक्षाच्या संघटनमंत्र्यांसह प्रदेश पातळीवरील एकाही पदाधिकाऱ्याने पक्षातील ठोकशाहीकडे गंभीरपणे पाहिले नाही. स्थानिक पातळीवरील काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्षातील या बेदिलीवर जाहीर नापसंती दर्शवली, पण नव्या पदाधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला.
यापाठोपाठ पक्षाच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला पक्षात नव्याने आलेल्या व कोणत्याही पदावर नसलेल्या अॅड. मुक्तेश्वर धोंडगे यांनी कंधार तालुक्याच्या वादग्रस्त कार्यकारिणी विषयावरून थेट जिल्हाध्यक्षांना लक्ष्य केले. जिल्हाध्यक्षांना अंधारात ठेवून भाजप कंधार तालुकाध्यक्षाची निवड एका गटाने केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनी ही नियुक्ती बेकायदा असल्याचे जाहीर केले. पण दुसऱ्या दिवशी धोंडगे यांनी पलटवार करीत आपण अजूनही ‘शेकापचा गडी’ आहोत, हे दाखवून दिले.
जिल्हाध्यक्ष विरुद्ध असंतुष्ट असा सामना पक्षात रंगला असताना पक्षाचा वर्धापनदिन उजाडला. पण वर्धापनदिन वैविध्यपूर्ण कार्यक्रम व उपक्रमांद्वारे साजरा करण्याचे ना नियोजन होते, ना त्यात काही कल्पकता होती. धर्माबाद, बिलोली व नायगाव येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष हे नायगाव तालुक्याचे भूमिपुत्र. तेथील शिबिरात दुपारी तीनपर्यंत केवळ ३० दात्यांनी रक्तदान केले. पक्षात विक्रमी सभासद नोंदणी झाल्याचा दावा केला जात असताना जिल्हाभरातील शिबिरांतून जेमतेम ५०० पिशव्या रक्त संकलित झाले.
पक्षाच्या महानगर शाखेला जिल्हय़ाचा दर्जा. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी झेंडावंदनावर वर्धापनदिन उरकला. पक्षाचे ज्येष्ठ नवनेते आजारपणामुळे विश्रांती घेत आहेत. त्यांच्यासमवेतचे इतर नवनेते कोणत्याही कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. जिल्हाध्यक्ष रातोळीकर यांनी सकाळपासून दुपापर्यंत धर्माबाद-बिलोली व नायगाव येथील कार्यक्रमांना हजेरी लावली. प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीत मुखेड तालुक्याला चांगले प्रतिनिधित्व मिळाले, पण तेथे रुग्णांना फळेवाटप करून वर्धापनदिन उरकण्यात आला. कंधारच्या कार्यकर्त्यांनीही फळवाटपावरच समाधान मानले.