कचराकोंडी सोडविण्यात अपयशी ठरलेल्या महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची शुक्रवारी राज्य शासनाने बदली केली. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सचिवपदी त्यांच्या नियुक्तीनंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. एका बाजूला प्रशासकीय पातळीवर ही कारवाई सुरू असताना शहरातील रस्त्यांवर तब्बल अडीच हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. कचऱ्याची ५० वाहने खचाखच भरली आहेत. हा कचरा कोठे टाकायचा, याचा पेच कायम आहे. कचराकोंडी न सुटल्यामुळे आता सर्वसामान्य जनतेला मदतीला घेऊन शनिवारी सकाळी ‘स्वच्छता हीच सेवा’ हे घोषवाक्य हाती घेऊन एक लाख नागरिक रस्त्यावर उतरतील आणि ते कोरडा कचरा एकत्रित गोळा करतील, अशी मोहीम विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आखली आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र सुरू करण्याच्या हालचाली शुक्रवारी सकाळी सुरू होत्या. आयुक्त डी. एम. मुगळीकर आणि महापौर नंदकुमार घोडेले हे वाळूज येथील एका उद्योजकाकडे असणाऱ्या प्रक्रिया यंत्राची पाहणी करण्यासाठी जाणार होते. वाळूज येथे ३०० मेट्रिक टनावर प्रक्रिया करता येईल, एवढय़ा क्षमतेची यंत्रसामग्री असल्याचे अलीकडेच अधिकाऱ्यांना माहीत झाले होते. जटवाडा भागात हे प्रक्रिया केंद्र सुरू करता येऊ शकते काय, याची चाचपणी केली जाणार होती. ही यंत्रणा पाहण्यासाठी निघालेल्या महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकरांच्या हातात थेट बदलीचे आदेश आले आणि ते परतले. त्यामुळे यंत्र वापराच्या आणि खरेदीच्या प्रक्रियेवर आजच्या दिवसात तरी पाणीच फेरले गेले.

यंत्रसामग्रीची वानवाच

कचरा वर्गीकरण केल्यानंतर प्रक्रिया करण्यासाठी घ्यावयाच्या यंत्रसामग्रीची अजूनही वानवाच आहे. केंद्र सरकारच्या ‘जेईम’ पोर्टलवर यंत्र खरेदी निविदेशिवाय करता येते. मात्र, या पोर्टलवर तीन कंपन्यांची यंत्रे आहेत. पाच लाख टनापर्यंतची ही यंत्रे किती उपयोगी पडतील, याविषयी अधिकाऱ्यांना शंका आहे. अ‍ॅग्रो ग्रीन केअर, वेस्टर्न सोल्युशन, समर्थ या तीन कंपन्यांची यंत्रे उपलब्ध आहेत. त्याचे दर किती, याची पाहणी आज होणार होती. शहरात या यंत्रांच्या साहाय्याने तीन-चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर कचऱ्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते, असे बदली झालेले आयुक्त मुगळीकर यांना  वाटत होते. मात्र, आता ही प्रक्रिया पुढे जाणार का, हे अजून समजू शकले नाही. पाच टनापेक्षा अधिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रे विकत घ्यायची असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ती प्रक्रियाही अद्याप पूर्ण झालेली नाही.

कचऱ्याचे ढीगच ढीग

शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीगच ढीग आहेत. कुंडय़ांमध्ये टाकलेल्या कचऱ्याला आग लावली जात आहे. शहरातील प्रभाग क्र. १, २ आणि ३ मध्ये तसेच प्रभाग क्र. ८ व ९ मध्ये कचऱ्याचे प्रमाण खूप अधिक आहे. कोरडा कचरा एकत्रित करता येऊ शकतो, असे ठरवून शनिवारी कचरा उचलण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले आहे. शहरातील अन्य प्रभागांमध्ये ओला आणि कोरडा कचरा वेगवेगळा केला जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत १० हजारांहून अधिक कचराकुंडय़ा विकत घेतल्या जाणार आहेत. स्मार्ट सिटीच्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार ही खरेदी होईल, असे डॉ. भापकर म्हणाले.

कचरा हटविण्यासाठी या संस्था ‘अग्रेसर’

शहरातील अडीच ते तीन हजार टन कचरा वेगळा करता यावा, यासाठी शनिवारी सकाळी विविध संस्थांनी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. यात पतंजली, स्वामी समर्थ केंद्र, अनुलोम या संस्थांचा समावेश आहे. अनुलोम संस्थेचे पाच हजार कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि स्वच्छतेच्या कामाला लागतील, असे संस्थेच्या वतीने विभागीय आयुक्तांना कळविण्यात आले आहे.

‘जमाते इस्लामी’चाही सहभाग

बहुतांश कचरा ज्या प्रभागात आहे, तेथे महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी जमाते इस्लामी या संस्थेने पुढाकार घेतला असून सात हजार महिला उद्या कचरा वर्गीकरणाच्या कामात सहभागी होणार आहेत. तेवढेच पुरुषही कोरडा कचरा गोळा करतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

मौलवी, कीर्तनकारही स्वच्छता अभियानात

शनिवारी कचरा हटविण्याच्या मोहिमेत मौलवी, कीर्तनकारही सहभागी होणार आहेत. शहरात व ग्रामीण भागात ११०० कीर्तनकारांचे एक संघटन असून कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी ते पुढाकार घेणार आहेत.