देशभरात ‘पद्मावत’ चित्रपटावरून करणी सेना आणि इतर राजपूत संघटना आक्रमक झाल्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित करू नये यासाठी निदर्शने करण्यात येत आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी औरंगाबाद शहरात पोलिसांनी चित्रपटगृहांना वेडा दिला. पोलीस बंदोबस्तात चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

चित्रपटाच्या वादग्रस्त पार्श्वभूमीवर अनेक शहरांत अव्वाच्या सव्वा तिकीटदर आकारण्यात आले. औरंगाबादमध्ये सर्वसाधारण दर होते. शहरातील पीव्हीआर चित्रपटगृहातील तीन स्क्रीनवर १३ शो ठेवण्यात आले आहेत. १६० रुपये तिकीट असून ७५ टक्के शो बुक असल्याची माहिती चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून देण्यात आली. तसेच शहरातील प्रोझोन आणि रिलायन्स मॉलमध्ये आयनॉक्स, फेम तापडिया, सेव्हनहिल परिसरातील नुपूर, खडकेश्वर भागात बिग अंजली या चित्रपटगृहांना देखील पोलीस संरक्षण देण्यात आल आहे.

शहरात सर्वत्र शांतता असून कोणतीही घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ८०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली धाटे-घाडगे यांनी दिली.