मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये करोनामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांच्या आकडेवारीतही दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. मंगळवारी ६५ वर्षीय महिलेचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे.

औरंगाबाद सध्या रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी शहरात संचारबंदी आणि इतरही उपायांचा अवलंब केला जात आहे. दुसरीकडं शहरातील करोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. भडकलगेट परिसरातील एका ६५ वर्षीय महिलेला करोनासदृश्य लक्षणं दिसून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २७ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर महिलेची चाचणी करण्यात आली होती. २८ रोजी चाचणीचा रिपोर्ट आला. त्यामध्ये महिलेला करोना झाल्याचं निष्पन्न झालं. रुग्णालयात दाखल केल्यापासून महिलेला व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तसेच इतरही आजार रुग्णाला होते, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे.

२४ जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

औरंगाबाद शहरातील रुग्णांची संख्या सोमवारपर्यंत २९७ इतकी होती. सोमवारी दिवसभरात १४ जणांना करोना झाल्याचं समोर आलं होतं. मंगळवारी संशयित असलेल्या २४ जणांच्या चाचणीचे रिपोर्ट आले. या सगळ्यांनाच करोनाची लागण झाल्याचं त्यातून स्पष्ट झालं आहे. यात जयभीमनगर परिसरात सर्वाधिक २१ रुग्ण आढळून आले आहेत. तर अजबनगर, बुद्धनगर आणि संजयनगर परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.