ऑनलाईन बक्षिसाचे आमिष दाखवून ९ लाख ९० हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवी दिल्ली येथील दीपक महेश चंद (वय २३) या तरुणास सायबर सेलच्या पोलिसांनी अटक केली. हुंदाई(आय २०) ही गाडी बक्षिसात लागली आहे म्हणून औरंगाबाद येथील मनोज प्रेमसिंग चव्हाण यांना नोंदणीसाठी ९ लाख ९० हजार रुपये बँक खात्यात भरण्यास आरोपीने भाग पाडले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी नवी दिल्ली येथून आरोपीस अटक केली आहे. ऑनलाईन बक्षीस मिळाल्याचे कळवून दीपक महेश चंद याने चव्हाण यांच्याकडून ९ लाख ९० हजार रुपये बँक खात्यात भरून घेतले. सायबर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा आरोपी नक्की कोणत्या भागातला याचा शोध घेतला. फरीदाबाद येथे जाऊन आरोपीची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. जवाहरनगर पोलीस ठाण्यात या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता.