वेळेत टँकर पोहचविल्याने अनेकांचे प्राण वाचले

खास प्रतिनिधी लोकसत्ता

औरंगाबाद : प्राणवायू टँकर चालकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे प्राण वाचले. तेही एका अर्थाने देवदूत म्हणावे लागतील असे मत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी टॅकर चालकांच्या सत्कार सोहळयात व्यक्त केले.

या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, अप्पर आयुक्त अविनाश पाठक, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उपायुक्त पराग सोमण, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे, उपायुक्त विणा सुपेकर, मागासवर्गीय कक्षाचे उपायुक्त शिवाजी शिंदे, उपायुक्त जगदीश मनियार, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, संगीता सानप यांची उपस्थिती होती.

मराठवाडा विभागात कोरोना सारख्या संकट काळात प्राणवायूची कमतरता येऊ न देता उत्तम प्रकारे कोरोनाकाळ हाताळला गेला असे सांगून श्री.केंद्रेकर म्हणाले की, सर्व सोईसुविधांसह जिल्हा प्रशासनाने परस्पर समन्वयातून उत्तम प्रकारे कर्तव्य पार पाडले आहे. त्यात ऑक्सिजन टँकरचालकांचा मोठा वाटा असून या सर्वांचा सकारात्मक परिणाम म्हणजे मराठवाडय़ाची उपचाराबाबत चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. मराठवाडा विभागात प्राणवायूचा वापर, खाटांची  उलब्धता, रेमडिसिवीरची उपलब्धता आदी साधने उपलब्ध होते.योग्य नियोजनामुळे कोरोना संसर्गाच्या संक्रमणाच्या प्रतिबंधाकरीता प्रशासनाला यश आले आहे, असे सांगून केंद्रेकर यांनी यावेळी टँकर चालकांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच कर्तव्यावर असताना टँकरचालकांना आलेले अनुभव देखिल जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी बोलताना टॅंकरचालक राजू जोगदंड म्हणाले, करोनाकाळात आम्ही जीव लावून काम केले. या सत्कारामुळे त्याचे मोल झाले. यावेळी श्री.केंद्रेकर यांच्या हस्ते अपर विभागीय आयुक्त अविनाश पाठक, उपायुक्त विणा सुपेकर यांचाही देखील विशेष सत्कार करण्यात आला. राजू जोगदंड, दिनेश चिंचणे, राम खटले, माधव गवई, दीपक गोर्डे, ऋषी वाणी, विष्णू बहीर, ज्ञानेश्वर निकाळजे, दीपक आलदाट, सय्यद निसार या ऑक्सिजन टँकरचालकांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.