पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांबाबतची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही यादी बोगस असल्याचे सांगत ती व्हायरल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.

ज्या पोलीस निरिक्षकांचा शहरात पोस्टिंग होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत असे अधिकारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलीस पात्र आहेत. या अधिकाऱ्यांच्या बदल्या शहराबाहेर करण्यात येणार असून त्यासाठी त्यांनी तीन पसंतीची ठिकाणं द्यावीत, असे आवाहन व्हायरल झालेल्या पत्रकातून करण्यात आले होते. मात्र, हे परिपत्रकच बोगस असल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला आहे.

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले, हा मेसेज कोणी व्हायरल केला याची चौकशी केली जात असून त्या अधिकार्‍यावर कडक कारवाई करण्यात येईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या होतील, त्याचे काम सुसुत्र पध्दतीने सुरु आहे. या संदर्भात अजूनही पोलीस महासंचालकांशी चर्चा सुरु आहे. त्यावर अद्याप अंतिम आदेश आलेले नाहीत.

मात्र, तरीही अचानक अशी यादी सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाल्याने माझ्यासहित सर्वच अधिकारी संभ्रमात पडले आहेत. हा गंभीर प्रकार असून याला कारणीभूत असणाऱ्याची कोणाचीही गय केली जाणार नाही, असे पोलीस आयुक्त प्रसाद यांनी म्हटले आहे.