शिवजयंतीनिमित्त मध्यरात्री भगवे झेंडे लावण्यास हरकत घेतल्याचे पर्यवसान सुमारे २०० ते २५० जणांच्या जमावाने सकाळी पोलीस चौकीवर चाल करून जाण्यात झाले. या वेळी हल्ला चढवून दोघा पोलिसांना बेदम मारहाण करण्यात झाली. यातील एका मुस्लीम पोलीस अधिकाऱ्याच्या हातात भगवा झेंडा देऊन चौकीतून मारहाण करीत करीत जेथे झेंडा लावण्यास पोलिसांनी हरकत घेतली होती, तेथपर्यंत ओढत नेले व त्याच्या हातानेच झेंडा रोवून ‘जय भवानी जय शिवराय’ घोषणा देण्यास भाग पाडले.. लातूर तालुक्यातील पानगाव येथे शिवजयंतीच्या दिवशी हा प्रकार घडला. मात्र, चार दिवसांनंतरही या गावातील वातावरण तणावपूर्ण असून गावात सध्या २५ पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. या प्रकरणी १२५ जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यातील १५ जणांना अटक करण्यात आली, तर उर्वरित फरारी आहेत.
शिवजयंती सर्वत्र नियोजनपूर्वक साजरी करण्यात आली. रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे आदल्या रात्री शिवभक्त भगवे झेंडे लावत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास गावातील एका चौकात झेंडे लावणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हटकले व या ठिकाणी झेंडे लावून नसता वाद निर्माण करू नका, असे समजावले. तेव्हा कार्यकत्रे तेथून निघून गेले व पोलीसही चौकीत परतले. मात्र, भगवे झेंडे लावू देण्यास पोलिसांनी विरोध केला, याचा राग काहींच्या मनात होता, त्यातूनच गावात पोलिसांविरोधात अफवा पसरवल्या गेल्या. सकाळी साडेआठच्या सुमारास गावातील दुकाने बंद करीत जमाव एकत्र जमू लागला. हा जमाव पोलीस चौकीवर चाल करून गेला. बाहेर उभे असणाऱ्या पोलीस नाईक आर. एल. आवस्कर यांना जमावाने बेदम मारहाण केली. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागून ते रक्तबंबाळ झाले. स्वतचा जीव वाचवण्यासाठी आवस्कर यांनी धूम ठोकली. मात्र, जमाव चौकीत घुसला व चौकीतील फíनचर, कागदपत्रांची नासधूस सुरू केली. सहायक पोलीस निरीक्षक युनूस शेख या वेळी आत बसले होते. जमावाने त्यांना बेदम मारहाण सुरू केली. शेख यांच्या हातात भगवे झेंडे देऊन पोलीस ठाण्यापासून ज्या ठिकाणी झेंडा लावण्यास रात्री मनाई केली होती, तेथपर्यंत त्यांना रस्त्यावरून मारहाण करीत नेण्यात आले. त्यांच्या हाताने तेथे झेंडा उभारला व जय भवानी जय शिवराय घोषणा देण्यास भाग पाडले. यानंतरच जमाव पांगला. जवळच्या रेणापूर पोलीस चौकीला याचे वृत्त कळवण्यात आले होते. त्यानंतर पोलीस व महसूल विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पानगावला भेट दिली. गेल्या ४ दिवसांपासून २५ पोलिसांची तुकडी पानगावात तळ ठोकून आहे.
गेल्या १० वर्षांत या गावातील मंडळींनी वेगवेगळ्या कारणांमुळे यापूर्वी दोन वेळा पोलीस चौकीवर हल्ला चढवून पोलिसांना मारहाण केली होती. त्यानंतर हा तिसरा प्रकार घडला आहे. पूर्वी घडलेल्या घटनेत गावकऱ्यांना जरब बसेल अशी कारवाई न झाल्यामुळे शिवजयंतीच्या दिवशी असे भ्याड कृत्य करण्याचे धाडस जमावाने दाखवले. जमावाचा राग पोलिसांवर होता. त्यातच मुस्लीम पोलीस समोर दिसल्याने त्याला मारहाण झाली. मारहाणीची घटना घडून गेल्यानंतर काही सुज्ञ मंडळींनी एकत्र येऊन शिवजयंतीची मिरवणूक काढली. गावात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे.
पानगाव येथे स्वतंत्र पोलीस चौकी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दूरस्थ पोलीस चौकी आहे. हल्ला व मारहाणीमुळे या ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसांना असुरक्षितपणा जाणवत आहे. सोमवारी पानगावला भेट दिली तेव्हा फारसे कोणी उघडपणे बोलायला तयार नव्हते. गणेश वांगे या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांने घडलेल्या घटनेमुळे गावाला गालबोट लागले असून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी, अशी भावना व्यक्त केली. गावातील मुस्लीम नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
एमआयएमचे राजकारण!
पानगाव घटनेच्या निषेधार्थ लातूर शहरातील गांधी चौकात एमआयएमच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार इम्तियाज जलील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पानगावात जमावाने मुस्लीम पोलीस होता, म्हणूनच मारहाण केली. राज्यात मुस्लीम समाजात असुरक्षितेची भावना असून या प्रकरणी पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेचा निषेध केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्रिपदाचा पदभार असताना पोलिसांवर अशा प्रकारे जमावाने चाल करून केलेला हा पहिलाच हल्ला आहे. या वरून पोलीसही असुरक्षित असल्याचे गडद चित्र निर्माण झाले आहे.