मानसशास्त्रातील तज्ज्ञांचा सल्ला

बिपीन देशपांडे लोकसत्ता 

औरंगाबाद : ऑनलाइन शिक्षणातून ज्ञानार्जनाच्या दृष्टीने प्रत्येक मुलाची एक वेगळी क्षमता असते. प्रत्यक्ष बघून-पाहून आणि प्रात्यक्षिक, अशी क्षमतेची वर्गवारी असून त्यातून केवळ २५ टक्केच मुलांना ऑनलाइन शिक्षणाचा फायदा होत असल्याचे निरीक्षण आहे. ज्यांना शिकवण्यातून फारसे आकलन होत नाही अशा मुलांकडून मोबाइलचा गैरवापर होत असून त्यांच्यामध्ये मोबाइलचे व्यसन जडले आहे. याविषयी शिक्षकही चिंतित आहेत. व्यसनाची पूर्तता झाली नाही तर चिडचिडेपणा, हट्टीपणा, आक्रस्ताळेपणा मुलांमध्ये वाढला असल्याच्या तक्रारी समोर येत असून त्या रोखण्यासाठी मुलांना चक्क घरात धिंगाणा घालू द्या, असा सल्लाच मानसशास्त्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

शाळेअभावी ऑनलाइन शिक्षण देण्यातून मुलांना मोबाइल फोनचे व्यसन जडत असल्याचे काही शिक्षक-शिक्षकेतर संघटनांकडूनही सांगण्यात आले असून यासंदर्भाने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांचीही भेट घेण्यात आली आहे. पुरोगामी शिक्षक-शिक्षकेतर संघटनेचे राज्याध्यक्ष भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नुकतीच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन मुले मोबाइल फोनच्या आहारी जात असल्याकडे लक्ष वेधून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे-शिसोदे यांनी सांगितले की, मुलांमध्ये हट्टीपणा, आक्रस्ताळेपणा, चिडचिडेपणा, मोबाइल फोनवर खेळण्यासाठी अन्यवेळीही शिक्षणाचा तास सुरू होणार असल्यासारखे खोटं बोलणे, असे प्रकार वाढत असून यासंदर्भाने मागील महिनाभरात ३० पालकांच्या तक्रारी आलेल्या आहेत.

एखाद्या व्यसनाधिन व्यक्तीच्या मेंदूमध्ये जशी एक जागा व्यापून राहते, अगदी त्याप्रमाणेच मुलांमध्ये मोबाइल फोन हाताळण्यासाठी आततायीपणा वाढल्याचे दिसते आहे. हे एक व्यसनाचेच लक्षण आहे. मोबाइल फोनशिवाय मुले काहीवेळ स्वस्थ बसू शकतात. मात्र, नंतर पुन्हा त्यांचा ओढा मोबाइल फोनकडे वाढतो.

ऑनलाइन शिक्षणातून मुले किती शिकतात हा प्रश्नच आहे. मेंदूमध्ये चेतापेशींचे काम सुरळीत होण्यासाठी एक जाळं तयार झालेले असते. मोबाइल फोनच्या लहरींमुळे  हे जाळे मध्ये-मध्ये तुटते. त्यामुळे जे मुलांना समजायचे ते अनेकांना समजतही नाही. त्यातून मुलांमधील समजूतदारपणाही कमी होताना दिसतो आहे. एखाद्या वस्तूची मागणी करताना त्याची गरज, आर्थिक बाजू याचा सारासार विचार न करता ती पाहिजे म्हणजे पाहिजे, असा हट्टीपणा मुलांमध्ये वाढल्याचे दिसून येते. आपण कुठंतरी वास्तवापासून दूरही जातो आहोत, असे डॉ. अष्टपुत्रे यांनी सांगितले.

ऊर्जा बाहेर येऊ द्या

मोबाइल फोनचे व्यसन तोडण्यासाठी मुलांना घरात धिंगाणा घालू द्या. एखादी वस्तू तुटेल, फुटेल, मोडेल म्हणून पालक धिंगाणा घालू देत नाहीत. परिणामी मुलांसमोर त्यांच्यामधील ऊर्जा बाहेर पाडण्यासाठीचा मार्ग उरत नाही. अशावेळी काही महत्त्वाच्या वस्तू इतरत्र हलवून किंवा त्याची खबरदारी घेऊन मुलांना उडय़ा मारू द्या, धिंगाणा घालू द्या.    – डॉ. अपर्णा अष्टपुत्रे-शिसोदे.