विघ्नहर्त्यां गणरायाचे जिल्हाभरात उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ३७४ गावांत एक गाव-एक गणपती संकल्पना राबविण्यात आली, तर शहरी भागातील गणेश मंडळांनी यंदाही एक वार्ड एक गणपती संकल्पनेला फाटा दिल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ३७५ मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. यात १ हजार १०५ परवानाधारक, तर २७० विनापरवानाधारक मंडळांचा समावेश आहे.
मागील गणेशोत्सवात १ हजार ३६३ मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली, तर ३२४ गावांत ‘एक गाव एक गणपती’संकल्पना राबविण्यात आली. उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यांतर्गत ४ व ग्रामीण ठाण्यांतर्गत १६, बेंबळी पोलीस ठाण्यांतर्गत १५, तुळजापूर १६, तामलवाडी ८, नळदुर्ग ३०, उमरगा २९, मुरूम १७, लोहारा १५, कळंब १७, ढोकी ३०, शिराढोण २६, येरमाळा २२, भूम ४८, वाशी १५, परंडा ४१ तर अंभी पोलीस ठाण्यांतर्गत २५ गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली. ३७४ गावांमध्ये एक गाव एक गणपती बसविण्यात आल्याने पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाला असून अनावश्यक खर्चालाही मोठय़ा प्रमाणात फाटा बसणार आहे.
जिल्ह्यातील ११ पोलीस ठाण्यांतर्गत २७० मंडळांनी विनापरवाना ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. यात उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४४, बेंबळी ३९, तामलवाडी ११, नळदुर्ग २६, लोहारा १४, ढोकी ४७, शिराढोण ३८, येरमाळा १२, वाशी १०, परंडा २६, तर अंभी पोलीस ठाण्यांतर्गत तीन मंडळांचा समावेश आहे.
मोठा बंदोबस्त तनात
गणेशोत्सव कालावधीत पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात तगडा बंदोबस्त तनात करण्यात आला आहे. अधीक्षकांसह अतिरिक्त अधीक्षक, तीन उपअधीक्षक, बाहेरील जिल्ह्यातील तीन उपअधीक्षक, जिल्ह्यातील जवळपास ५० अधिकारी, १ हजार ३०० पोलीस कर्मचारी, ७०० होमगार्ड, शिवाय एसआरपी, एसएसबीची तुकडी असा बंदोबस्त तनात आहे. याशिवाय बॉम्ब शोधक-नाशक पथकासह इतर पथकेही तनात आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी बंदोबस्त आणखी वाढविला जाण्याची शक्यता आहे.