नाकरे टेस्टबाबतचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

औरंगाबाद : कर्जामुळे शिक्षण संस्थाचालक विश्वास सुरडकर यांनी स्वत:चाच खून करण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिल्याची कबुली आरोपीने दिली. मात्र हे कारण सयुक्तिक व परिस्थितीजन्य पुराव्यावरून सबळ वाटत नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपी अजय ऊर्फ अजीज बिस्मिल्ला तडवी याची नार्को टेस्ट करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी दाखल केलेला विशेष अर्ज सोमवारी न्यायालयाने फेटाळला. तसेच तडवीची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी दिले.

आरोपी तडवीचा कबुलीजबाब न्यायालयात नोंदविला असून ज्या शस्त्राने सुरडकरचा खून केला होता, ते जप्त केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

या प्रकरणात मृत विश्वास चंद्रशेखर सुरडकर यांचा जुळा भाऊ विनोद चंद्रशेखर सुरडकर यांनी तक्रार दिली होती. तक्रारीवरून राजु त्रिबंकराव दीक्षितसह पुरुषोत्तम अग्रवाल, जुबेर मोतीवाले, मोहसीन यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी शनिवारी अजय ऊर्फ अजिज बिस्मील्ला तडवी याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडी दरम्यान तडवीने विश्वास सुरडकर यांनीच आपल्याला स्वत:ची हत्या करण्याचे सांगत एक लाख रुपये देतो, असे सांगितल्याचा जबाब दिला होता, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते.