सुहास सरदेशमुख 

सर्वत्र मृत्यूचे तांडव सुरू आहे. घरात बसा, असा सरकारचा सल्ला आहे. सारे व्यवहार सकाळी ७ ते ११ वेळेत करण्याच्या नव्या नियमांचा फटका बसतो आहे तो कचरावेचकांना. गेली १५ वर्षे कचरावेचक म्हणून आयुष्य जगणाऱ्या अनिता भालेराव सांगत होत्या, ‘आता मिळकतही अर्धी झाली आहे आणि जगणेही.’ दीडशे रुपये कचऱ्यातून भंगार गोळा करून त्या काही दिवसापासून मिळवीत. पण त्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत वणवण भटकावे लागायचे. भंगार गोळा करून त्यांची विक्री सायंकाळी केली की चूल पेटत असे. आता सकाळी सात ते ११ पर्यंत कितीही भंगार गोळा करायचे म्हटले तरी ४० रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळूच शकत नाहीत. ११नंतर भंगार खरेदी करणाऱ्यांचीही दुकाने बंद होत असल्याने औरंगाबाद शहरातील अनिता भालेरावसारख्या अडीच- तीन हजार महिलांचे अर्थकारण आक्रसले आहे.

औरंगाबाद शहरातील नेहरू महाविद्यालयाच्या शेजारी शिवाजीनगरजवळ अमिर बेग यांचे भंगार खरेदीचे दुकान आहे. दिवसभरात विविध भागात फिरून काच, पत्रा, पुठ्ठा, काचेच्या बाटल्या गोळा करून त्या आणणाऱ्या अनेक महिला आणि पुरुष त्यांच्याकडे येतात. पण आता भंगार दुकानही ठरावीक वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवता येत नाही. दुकाने बंद झाल्याने अर्ध्यावरती जगणे आलेल्या शेख मोईन शेख सांगत होते,‘ दोन लहान मुले आहेत. बायको दोन महिन्यापासून माहेरी गेली आहे. आता भंगार गोळा करून आणायचे तरी किती आणि त्यातून पैसे मिळणार तरी किती? पाव-चिवडा अशा खाण्याच्या वस्तू आणतात मुले. भागते कसेबसे.’ खाणारी तोंडे आणि मिळकत याचा ताळेमेळ बसत नाही. गेल्या टाळेबंदीमध्ये थोडी का असेना मदत मिळत असे. आता तीही मिळत नाही. अशी स्थिती कातांबाई दादाराव आव्हाड या महिलेची. आयुष्याची तीस वर्षे त्यांनी कचरावेचक म्हणून काढली. पण करोनामुळे ‘हालत बिघडली’ असल्याचे त्या सांगतात. काच, चप्पल-बूट दोन रुपये किलो असा दर तर पुठ्ठा पाच रुपये किलोने भंगार दुकानदार खरेदी करतात. पण आता पुठ्ठा फारसा मिळत नाही. कारण नवे सामान घेणारे ग्राहकही कमी आहेत, त्यामुळे सारे अर्थकारण बिघडले असल्याचे सांगण्यात येत आहे. गेले वर्षेभर अधिक मेहनत आणि कमी पैशात आयुष्य कंठणाऱ्या कचरावेचकांची पुन्हा नव्याने परवड सुरू झाली आहे.

भारतनगर भागात राहणाऱ्या अनिता भालेराव करोनाकाळातील अनुभव सांगताना म्हणाल्या की, पूर्वी कोणाला पिण्यासाठी पाणी मागितले तर सहजपणे मिळायचे. आता तोंडाला बांधलेला रुमाल काढतील म्हणून कोणी पाणीही देत नाहीत. आता जगणे अधिक मुश्कील झाले आहे. करोनाचे निर्बंध गेल्या टाळेबंदीच्या तुलनेने सौम्य असल्याने किमान दिवसाचा मेहनताना ४० रुपयांवर आला आहे.  दिवसभराच्या मेहनतीचा विचार करता या वर्गाला काही ना काही मदत मिळायला हवी अशी मागणी एएसएस युनिटचे कचरावेचक कष्टकरी सभेच्या लक्ष्मण माने यांनी मुख्यमंत्र्यांकडेही केली आहे. करोनामध्ये टाळेबंदी अपरिहार्य बनली असली तरी त्याचा परिणाम आता कष्टकरी वर्गाला बसू लागला असून त्याचे अर्थकारण कमालीच्या घसरणीला लागले आहे.