जालन्यातील बियाणे उद्योगाची मोठी हानी

बियाणे उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या जालना जिल्हय़ात सकाळी आठच्या सुमारास १८८ गावांमध्ये आठ मिनिटे गारपीट झाली आणि कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. वाघरूळ या साडेतीन हजार वस्तीच्या गावात बाराशेहून अधिक शेडनेटमधून बियाणे उत्पादकांच्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडा झाला. एका शेडनेटसाठी १ लाख ६३ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. बाराशेहून अधिक शेडनेट असणाऱ्या वाघरूळमधील शेतकरी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगत होते, ‘आमच्या स्वप्नांचा चुराडा झाला.’

वाघरूळ येथील राजेश रामदास खांडेभराड या शेतकऱ्याने साडेतीन एकरात खरबूज आणि मिरची ही दोन पिके शेडनेटमध्ये घेतली होती. ६३ हजार रुपये नेटचा खर्च, ते उभे करण्यासाठी लोखंडी खांब आणि तारांचा सात हजारांचा खर्च, मशागत-मजुरी आणि रोपे यांचा खर्चही मोठा. सकाळी अचानक गारा आल्या आणि काही मिनिटांमध्ये त्यांचे शेडनेट उद्ध्वस्त झाले. अशीच स्थिती द्राक्ष उत्पादक शिवाजी रामचंद्र गायकवाड यांची. इंदलकरवाडी या हजार लोकसंख्येच्या गावात गायकवाड यांनी दोन एकरांत द्राक्षे लावली होती. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे दहा लाख रुपयांचे कर्ज त्यांच्यावर आहे. अडीचशे क्विंटल द्राक्षे येतील आणि ती अमरावतीच्या बाजारपेठेत विकू असे त्यांनी ठरवले होते. वीस क्िंवटलचा माल अमरावती बाजारपेठेत पोचला आणि पुढचा माल भरण्यासाठी गाडी येऊन उभी होती. चाळीस रुपये प्रतिकिलो दराने द्राक्षे विकली गेली तर मोठा फायदा होईल असे त्यांना वाटत होते, पण त्यांचे स्वप्न गारपिटीने उद्ध्वस्त केले. आई-वडील, बहीण-भाऊ सारे जण शेतीत राबतात. आता हे नुकसान भरून निघायचे कसे असा त्यांचा सवाल आहे. ते म्हणाले, ‘शेडनेटमधील पिकांचा आणि द्राक्षाचा पीकविमा काढला जात नाही.’

जालना जिल्हय़ात या वर्षी रब्बी पिकाच्या पीकविम्याचा हप्ता भरण्यासही शेतक ऱ्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. चाळीस हजार हेक्टरांहून अधिक क्षेत्रावर फळबागा लावण्यात आलेल्या आहेत. जालना, मंठा, अंबड या तालुक्यांत गारपिटीने मोठे नुकसान झालेले आहे. पीकविमा घेणाऱ्या सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बोलणी झाली असून त्यांना पंचनाम्यासाठी जिल्हय़ात बोलावले आहे. पण प्रत्यक्ष नुकसान किती झाले, हे लगेच सांगता येणार नाही, असे कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांनी सांगितले. जालना जिल्हय़ात महिको, मुनसेंटो, बायर, अजित यासह वीसहून अधिक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे बियाणे तयार करण्याचे काम वाघरूळ जहागीर, पोखरी सिंदखेड, कुंभेपळ सिंधखेड, वरखेडा, गोंदेगाव, इंदलकरवाडी, धावेडी या गावांतील शेतकरी करतात. एकेका गावात हजारभर शेडनेटद्वारे बियाणे उत्पादन करणारे शेतकरी आहेत. त्या प्रत्येक शेतकऱ्याचे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बियाण्यांच्या क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जालना जिल्हय़ाला या गारपिटीचा कोटय़वधी रुपयांचा फटका बसला आहे, तोही केवळ आठ मिनिटांत.

दुष्काळानंतर पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मराठवाडय़ात सर्वाधिक. वेगवेगळ्या पिकांसाठी तब्बल ६३ लाख ६७ हजार ६७० शेतकऱ्यांनी अर्ज केले. ६४.३ लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा भरला, पण रब्बीमध्ये विमा भरणाऱ्यांची संख्या कमी झाली. मराठवाडय़ातील ६.७२ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले, पण अनेक पिकांचा विमाच निघत नाही. बियाणे तयार करणाऱ्या शेतकऱ्यांची शेती शेडनेटमधली. त्याचा पीक विमाच होत नाही. द्राक्षाचेही तसेच. त्यामुळे निर्सगाने मारले की कर्ज वाढविण्यासाठी बँकांची पायरी झिजवायची, हे चित्र गावोगावी दिसणारे.

नुकसानीचा प्राथमिक अहवाल

  • जालना- १७५ गावे- ३२ हजार हेक्टर.
  • बीड- ४२ गावे- १० हजार ६३२ हेक्टर.
  • मोसंबी, द्राक्ष या फळपिकांचे मोठे नुकसान.