औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीतील विष्णू रामभाऊ काळवणे (वय ५३) या लघु उद्योजकाने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी विष्णू काळवणे यांनी पुण्यातील आपल्या मुलीला लिहिलेल्या पत्रात, मंदीसदृश परिस्थिती आणि आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे थकीत वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरणे शक्य होत नसल्याच्या नैराश्यातून आपण जीवन संपवत असल्याचे नमूद केले आहे.

गंगापूर तालुक्यातील फुलशेवरा गावचे मूळ रहिवासी असलेले विष्णू काळवणे हे वाळूजच्या सिडको परिसरातील महानगर भागात असलेल्या साक्षीनगरात राहत होते. त्यांनी औद्योगिक वसाहतीच्या सेक्टर डब्ल्यूमध्ये श्री गणेश इंडस्ट्रीज नावाची कंपनी सुरू केली होती. अलिकडे निर्माण झालेल्या मंदीसदृश परिस्थितीमुळे काळवणे यांच्या कंपनीला मिळणारे काम थंडावले होते. त्यामुळे कंपनीच्या एकूण सर्वच व्यवहारावर परिणाम होऊ लागला. कामगारांनाही पगार देणे आर्थिक व्यवस्थापनात बसणे शक्य होत नव्हते. त्यात थकीत वस्तू व सेवा कराची रक्कमही वाढू लागली. हा थकीत कर भरण्यात यावा, असा तगादा जीएसटी अधिकाऱ्यांकडून सुरू होता.

या अधिकाऱ्यांपैकी कीर्ती साहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर माझ्यापुढे जीवन संपवण्याशिवाय अन्य पर्याय नाही, असे एका चिठ्ठीवर लिहून विष्णू काळवणे यांनी ती चिठ्ठी आत्महत्येपूर्वी पुण्यात राहणारी मुलगी रोशनी जाधव यांना मोबाइलवरून पाठवली होती. ही चिठ्ठी पाहताच रोशनी यांनी कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. मात्र कुटुंबातील सदस्यांनी विष्णू काळवणे यांच्यापर्यंत धाव घेण्यापूर्वीच त्यांनी राहत्या घरात गळफास लावलेला होता. पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. घटनेची नोंद एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद झाली. विष्णू काळवणे यांनी चिठ्ठीत नमूद केलेल्या जीएसटी अधिकाऱ्यांविरुद्ध अद्याप कुठलीही तक्रार पुढे आलेली नाही, असे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले.