हिंगोली येथील आगारप्रमुखांच्या मनमानी कारभाराविरुद्ध तीन कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त करून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला.  महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटना व राष्ट्रीय एस. टी. कामगार काँग्रेस या तीन संघटनांचा यात समावेश आहे.
आगारात पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतागृहात अद्याप पाण्याची व्यवस्था नाही, मार्गस्थ गाडय़ांना नियमाप्रमाणे टूल-ड्रायरस् दिले जात नाहीत, तसेच एस.टी. बस मार्गावर वारंवार बिघडत आहेत, लांब व मध्यम पल्ल्याच्या गाडय़ा दिशादर्शक दिवे, आतील दिवे, हॉर्न आदी बंद अवस्थेत आहेत. चालकांनी या कारणासाठी बस थांबवली की, त्यांनाच शिक्षा दिली जाते. तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे रोटेशन नियमाप्रमाणे करावे, आगारातील नवीन सुरक्षा रक्षक गेट ते जुने सुरक्षा गेट या दरम्यान चालू बसच्या मागे विद्यार्थी, प्रवासी पळत आहेत. यामुळे अपघात झाल्यास चालकाला जबाबदार धरू नये, असेही या संघटनांनी पत्रकात नमूद केले आहे. गाडय़ांच्या अस्वच्छतेमुळे प्रवासी वारंवार चालक-वाहक यांच्याशी वाद घालत आहेत. इतकेच नाही तर त्यामुळे एस.टी.च्या उत्पन्नावरसुद्धा विपरीत परिणाम होत असल्याचेही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.