बिपीन देशपांडे, औरंगाबाद

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) पाठय़वृत्ती थांबल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांची फरपट सुरू झाली आहे. नव्या सरकारने ‘सारथी’ संस्थेची स्वायत्ता काढून घेतल्याचे पत्रक काढल्यामुळे विद्यार्थ्यांवर ही वेळ ओढावली आहे. यातील १८० विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आहेत.

शासनाकडून ‘सारथी’ची स्वायत्ता काढून घेतल्याचे एक परिपत्रक काढण्यात आले. या पत्रामुळे सारथीचा सर्व कारभार सरकारी पातळीवरून हाताळला जाईल आणि त्यात दिरंगाई वाढत जाईल, तसेच त्यातून जगण्याचे अनेक प्रश्न समोर निर्माण होतील, अशी भीती सारथीच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. नव्या सरकारचे अजूनही मंत्रिमंडळातील खातेवाटप झालेले नाही. खातेवाटप केव्हा होईल आणि पाठय़वृत्तीची रक्कम केव्हा मंजूर होईल व ती आमच्या हातात केव्हा पडेल, अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावू लागली आहे.

पाठय़वृत्तीसाठी नोकरी सोडली : बीड जिल्ह्य़ातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील सीमा एका महाविद्यालयात तासिका तत्त्वावर नोकरी करायची. आठ ते दहा हजार रुपये कसेबसे मिळायचे. दरम्यान, तिला छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) ३० हजारांची पाठय़वृत्ती मंजूर झाली आणि नियमानुसार आहे ती नोकरी सीमाला सोडावी लागली. अर्थार्जनाचा स्रोतच थांबला. बुलडाण्यातील पती, दोन मुलांसह राहणाऱ्या मनीषा यांची तर आणखीही मोठी अडचण झाली आहे. तीन महिन्यांपासून ना पगार, ना ‘सारथी’ची पाठय़वृत्ती मिळाल्याने तिच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

‘उदरनिर्वाहाचा प्रश्न’ : बुलडाण्यातील शिंदखेडराजामधील गणेश यानेही औरंगाबादेतील एका महाविद्यालयात सुरू असलेली अध्यापकाची नोकरी सोडली. गणेश हेही शेतकरी कुटुंबातील. १५ एकर शेती आहे. परंतु, तीन भाऊ, आई-वडील, असे मोठे कुटुंब असल्याने नोकरीवर स्वत:च्या शिक्षणाचा खर्च भागवायचो. पण आता नोकरी सोडली. पाठय़वृत्तीची रक्कम कधी मिळेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्य़ातील कारंजा लाड येथील प्रवीण बोणके यानेही ‘सारथी’ संस्थेची स्वायत्ता काढून घेतल्याबद्दल आता आमचे भवितव्य अंधारात लोटले गेल्याचे सांगितले.