नोकरीसाठी पैसे भरूनही नोकरी मिळत नसल्याने कृष्णा चिलघर (वय ३२, रा.संजयनगर, बायजीपुरा) याने गळफास घेवून गुरूवारी (दि.१७) आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने लिहुन ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये लोकविकास बँकेचे संस्थापक अध्यक्ष जे.के.जाधव यांच्यासह तत्कालीन पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे आदींनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप त्याने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा उर्फ किशोर चिलघर हा युवक गेल्या काही वर्षापासून नोकरीच्या शोधात होता. परंतु नोकरी लागत नसल्याने तो प्रचंड मानसिक आणि आर्थिक विवंचनेत सापडला होता. गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरी छताच्या पंख्याला साडीने बांधुन गळफास घेतला होता. हा प्रकार कृष्णा चिलघर याची पत्नी व नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास उपचारासाठी बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.

दरम्यान, कृष्णा चिलघर याने आत्महत्या करण्यापुर्वी लिहुन ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये लोकविकास बँकेचे संस्थापक अध्यक्ष जे.के.जाधव, विक्रांत जाधव, तत्कालीन पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, तत्कालीन जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक फईम हाश्मी यांनी आपला मानसिक छळ केला असल्याचा आरोप केला आहे. तसेच लोकविकास बँकेतून कर्ज घेवून ते पैसे जाधव यांना नोकरी लावून देण्यासाठी दिले असल्याचे नमुद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.