पोलीस उपायुक्त खाटमोडे पाटील यांची माहिती

औरंगाबाद : व्हॉट्सअ‍ॅपवरील एखाद्याचे स्टेटस वारंवार पाहणे हे पाळत ठेवण्यासारखे असून तो एक प्रकारचा गुन्हा आहे. स्टेटस वारंवार पाहणाऱ्यांवर विनयभंगाच्या ३५४ कलमांनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी दिली.

पोलीस आयुक्तालयात सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते. हैदराबाद येथील निर्भयावर अत्याचार करून हत्या करणाऱ्या तिच्या मारेकऱ्यांना अटक करावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस उपायुक्त खाटमोडे पाटील यांना सादर करून स्थानिक पातळीवर महिलांच्या सुरक्षिततेची माहिती जाणून घेण्यात आली. या वेळी खाटमोडे पाटील यांनी मुलींच्या छेडछाडी प्रकरणाचे काही प्रकार पत्रकारांना सांगितले. एका तरुणीचा शहरातील एक तरुण फक्त पाठलाग करत होता. तरुणाने कुठलाही थेट त्रास दिला नाही. पण संबंधित तरुणीच्या हालचालींवर लक्ष त्याच्याकडून ठेवले जात होते. तिच्यासोबत कोण आहे, कौटुंबिक परिस्थिती याची माहिती तरुणीच्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवरून तो तरुण जाणून घेत होता. याचा अर्थ तो तरुण तिच्यावर पाळत ठेवून होता. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहणे हा कलम ३५४ कलमान्वये गुन्हा ठरतो, असे खाटमोडे पाटील यांनी सांगितले.

शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरात दुसऱ्या किंवा तिसऱ्या कामकाजाच्या सत्रात काम करणाऱ्या महिला कामगारांच्या संरक्षणासाठी पोलीस विभागाकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे. शस्त्रधारी महिला पोलीस अधिकारी नियुक्त असून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी पोलीस विभागाने घेतलेली आहे. तरुणींनीही फसवणूक होणार नाही, याची काळजी घेत कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

साडेतीन हजार सीसीटीव्ही खासगी

शहरात अपुरे सीसीटीव्ही असून त्याबाबत पोलीस कोणत्या उपाययोजना करत आहेत हे सांगताना खाटमोडे पाटील यांनी काही सीसीटीव्ही बंद असले तरी खासगी व्यक्तींकडील साडेतीन हजार सीसीटीव्हींची मदत तपास कामासाठी घेण्यात येत असल्याची माहिती दिली. शरणापूर ते नगरनाका हा परिसर मात्र अद्याप कुठल्याही सीसीटीव्हीच्या क्षेत्रात येत नसून त्यासाठीही पोलीस विभागाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.