11 July 2020

News Flash

दहा हजार विनापरवाना ऑटो, कारवाई फक्त १७० ऑटोंवर!

जिल्ह्यात परवानाधारक ३ हजार ऑटो असून विनापरवाना १० हजार ऑटो आहेत, अशी माहिती खुद्द पोलीस प्रशासनाने दिली

जिल्ह्यात परवानाधारक ३ हजार ऑटो असून विनापरवाना १० हजार ऑटो आहेत, अशी माहिती खुद्द पोलीस प्रशासनाने दिली. आजपर्यंत विनापरवाना ऑटो मोठय़ा प्रमाणावर जिल्हाभरात चालत असल्याचे उघड झाले आहे. विनापरवाना व परवानाधारक ऑटोंची संख्या १३ हजार असताना तपासणी मात्र केवळ १७० ऑटोंची झाली आहे.
परभणी शहरात गेल्या दोन दिवसांपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व शहरातील पोलीस ठाण्याचे कर्मचारी संयुक्तरीत्या विनापरवाना व नियमबाह्य ऑटोच्या कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. या तपासणीत काल दिवसभरात त्यांना १७० ऑटोंची तपासणी करणे शक्य झाले. शहरातील विनापरवाना, नियमबाह्य, खासगी वाहनांचा वापर करणाऱ्या, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक, वाहनाचा विमा नसणे आदींबाबत तपासणी करून ही वाहने नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणण्यात आली. अशा ऑटोमधून प्रवासी कोंबून प्रवास केल्याने अनेकांच्या जीवितास धोका आहे. प्रसंगी अनेकांना जीव गमवावा लागतो, असे पोलीस प्रशासन लेखी स्वरूपात कबूल करीत असताना कारवाई मात्र का होत नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. दहा हजार ऑटो विनापरवाना चालत असतील, तर जनतेच्या जीविताचे रक्षण आता रामभरोसेच आहे.
विनापरवाना तीनचाकी वाहनांना वठणीवर घालण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचे नियम डावलून ऑटोचालकांची वाहतूक सुरू असते. ऑटोमध्ये अनेक शाळकरी मुलांना कोंबून वाहतूक केली जाते. या सर्व बाबींना आळा बसावा, या हेतूने पोलीस प्रशासनातर्फे शहरात व तालुकास्तरावर तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवारी परभणीतील मुख्य चौक, रेल्वेस्थानक, शिवाजी पुतळा, खानापूर फाटा, मोंढा परिसर, बसस्थानक आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाई चालूच राहील, असे विशेष पथकामार्फत कळविण्यात आले आहे. कारवाई पथकात पोलीस निरीक्षक एस. बी. जगताप,  शानमे, पोलीस उपनिरीक्षक गुलाब राठोड, कापुरे, कांबळे, गिते, शेख यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2015 3:35 am

Web Title: ten thousand unlicensed auto action auto
Next Stories
1 मंठय़ात भाजपशी हातमिळवणीची काँग्रेस श्रेष्ठींकडून गंभीर दखल
2 ‘भोपे पुजाऱ्यांना दानपेटीतून मावेजापोटी दिलेले कोटय़वधी रुपये वसूल करावेत’
3 वीज क्षेत्रातील कंपन्यांची जानेवारीत पुनर्बाधणी
Just Now!
X