औरंगाबादमधील सुराणानगरात दहा दिवसांत भरदिवसा दुसरे घर फोडून चोरांनी २१ तोळ्याचे दागिने आणि ६० हजारांची रोकड लांबवली. गेल्या १९ जानेवारी रोजी देखील याच भागातील व्यवसायिकाचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि ३९ हजारांची रोकड लांबवली होती. या घटनेनंतर लगेचच दहा दिवसांनी दुसरी घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे २७ जानेवारी रोजी दुपारी अवघ्या पावणेतीन तासात घर फोडल्याने चोरांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हान दिले आहे.

सुरतमधील दुरदर्शन केंद्रात सहायक अभियंता पदावर असलेले प्रदीप मोहरीर यांची पत्नी ज्योती व मुलगी अर्पिता (१७) अशा दोघी सुराणानगरातील घरात राहतात. तर प्रदीप हे नोकरीमुळे सुरतला असतात. ते अधुन-मधुन शहरात येतात. २७ रोजी दुपारी दोनच्या सुमारास ज्योती आणि अर्पिता या व्यंकटेशनगरात खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या बंद केलं होतं. दुपारी पावणे पाचच्या सुमारास त्या घरी परतल्या. त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले. यानंतर आत गेल्यावर त्यांना पाठीमागील दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला दिसला. तसेच दोन्ही बेडरुमच्या कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचा त्यांना संशय आला. कपाटांची तपासणी केली असता त्यांना सात तोळ्याच्या चार सोन्याच्या बांगड्या, दोन तोळ्याचे नेकलेस, चार व तीन तोळ्याचे दोन मंगळसूत्र, एक तोळ्याची सोनसाखळी, एक तोळ्याचे ब्रेसलेट, तीन तोळ्याचे कानातले आणि ६० हजारांची रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन ज्योती यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. ज्योती यांच्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक दत्ता शेळके करत आहेत.

दहा दिवसांपुर्वी घडली घटना…..
भाचीच्या लग्नासाठी सहकुटूंब बाहेरगावी गेलेल्या सुराणानगरातील व्यवसायिक घनश्याम रामनारायण राठी यांच्या बंगल्यात शिरलेल्या चोरांनी सायंकाळी बंगल्याचा दरवाजा तोडून आतील तब्बल नऊ तोळे सोने, अकरा किलो चांदी आणि ३९ हजाराची रोकड लांबवली होती. या घटनेनंतर लगेचच दहा दिवसांनी ही दुसरी घटना राठी यांच्या घरापासून काही अंतरावर घडली आहे.