आष्टी शहरात सुरू असणारे १६ टँकर शनिवारी बंद झाले आणि एक वर्ष आठ महिन्यांनंतर मराठवाडय़ातील टँकरचा फेरा थांबला. फेब्रुवारी २०१८ मध्ये मराठवाडय़ात टँकरला सुरुवात झाली होती. ‘टँकर आवडे सर्वाना’ अशी स्थिती मराठवाडय़ाने अनुभवली. टँकरचा फेरा अगदी शंभर किलोमीटपर्यंतही गेला. राहुरीचा टँकर, मिरजेचा ठेकेदार अशी स्थिती असणारा टँकरचा भोवताल कधी थांबणार, या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नव्हते. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आणि तब्बल एक वर्ष आठ महिन्याने टँकरचा फेरा बंद झाला. टँकरची संख्या आता सरकार दरबारी शून्य झाली.

गेली नऊ वर्षे एकही वर्ष असे नव्हते की ज्यामध्ये मराठवाडय़ातील आठ जिल्हय़ांमध्ये टँकर लागले नाहीत. सरासरी एक हजार ३२४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. या वर्षी त्यात भर पडेल अशीच स्थिती होती. साडेतीन हजारांहून अधिक टँकरची संख्या टंचाईत होती. पाण्याचे एवढे दुर्भिक्ष मराठवाडय़ाने अनुभवले की सकाळी टँकर भरण्यासाठी लावल्यानंतर दुपापर्यंत तो भरला जाईल की नाही, याची खात्री देता येत नसे. या वर्षी टँकरचा खर्च अधिक असेल. शिवारात ऊस आणि गावात टँकर असा विरोधाभासही मराठवाडय़ात दिसत असे. या वर्षी टँकरचा फेरा थांबला आहे. आष्टी शहरातील टंचाई स्थिती टँकरशिवाय हाताळता येईल, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या आणि शहरी भागातील टँकर थांबले. मराठवाडय़ात या वर्षी परतीचा पावासाने जोरदार हजेरी लावल्याने धरणांमधील पाणीसाठे वाढू लागले. बहुतेक शहरांना आता पुढील  पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची चिंता राहिलेली नाही.

टँकरचा हजारी पार इतिहास..

* गेल्या नऊ वर्षांत २०१२ मध्ये १३०७ टँकर लागले होते. त्यानंतर लगेच पुढच्या वर्षी म्हणजे २०१३ मध्ये टंचाईची तीव्रता वाढली. तेव्हा २१३६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला.

* सर्वाधिक पाणीटंचाई जाणवली ती २०१५ मध्ये तेव्हा ४०१५ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता.

* २०१६ व २०१८ मध्ये अनुक्रमे ९४० व ९७३ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. केवळ २०१०, २०११ आणि २०१७ या वर्षांत टँकरची संख्या तुलनेने कमी होती.

* त्यातही सर्वात कमी टँकर लागले ते २०१७ मध्ये. ही संख्या २१८ एवढी होती. २०१९ मध्ये टँकरची संख्या साडेतीन हजारांच्या घरात होती.