पर्यटनाच्या राजधानीत देश-विदेशातील पर्यटकांना सुरक्षित वाटावे, त्यांचे संरक्षण व्हावे, तसेच पर्यटनाचा आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून टूरिझम पोलीस मोबाईल सेवेस गुरुवारी विजयादशमीचे मुहूर्त साधून प्रारंभ करण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून याचे उद्घाटन झाले. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे या वेळी उपस्थित होते.
या संकल्पनेअंतर्गत चार पोलीस कर्मचाऱ्यांना टूरिझम विभागाकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले. जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेणी, पानचक्की, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, बारावे ज्योतिर्लिग घृष्णेश्वर मंदिर अशा अनेक ठिकाणी देश-विदेशातून वर्षभर पर्यटक येत असतात. या पर्यटकांना शहरात सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांचे संरक्षण व्हावे, तसेच त्यांचा पर्यटनाचा आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने या सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
विजयादशमीनिमित्त पोलीस मुख्यालयात शस्त्र व वाहनांची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते पारंपरिक उत्साहाने पूजा करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त रमेश गायकवाड, अंबादास गांगुर्डे, अविनाश आघाव, एन. जी. पठाण यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.