सुहास सरदेशमुख

शेती प्रश्नांचा गुंता मोठा आणि सोडवणुकीसाठी होणारे प्रयत्न तसे कमीच. गावपातळीवर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काय करावे याची मोजकीच उत्तरे दिली जातात. त्यातील काहीच यशस्वी होतात. शेती मशागतीवर होणारा खर्च तसा मोठा. हा खर्च निम्म्यावर आणण्याचा प्रयत्न औरंगाबादमधील पाटोदा ग्रामपंचायतीने केला आहे.

या ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर विकत घेतला आणि नांगरणी, सरी पाडणे, रोटावेटरने जमिनीचे सपाटीकरण करणे आदी कामे बाजारपेठेतील किमतीपेक्षा ५० टक्केच खर्चात करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आदर्श गाव म्हणून ओळख असणाऱ्या औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा गावातील या प्रयोगाची चर्चा आता नव्याने होऊ लागली आहे. कर भरणाऱ्या नागरिकांना गिरणीतून दळण फुकट, केवळ १५ रुपयांत एक हजार लिटर पाणी अशा विविध योजना राबविणाऱ्या आदर्श गावाने बाजारभावापेक्षा ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरचा दर कमी ठेवला आणि आता उत्पादन खर्चात मोठी बचत होत असल्याचा दावा पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे करतात.

जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायतीचा स्वनिधी असतो. तो भास्कर पेरे यांनी कर्जरुपाने घेतला. ट्रॅक्टरची रक्कम आणि कृषी विभागातील ट्रॅक्टर योजनेतील व्याजदर सवलतीचा लाभ घेत पाटोदा ग्रामपंचायतीने १ जानेवारी २०२० मध्ये ट्रॅक्टर घेतले. ट्रॅक्टरव्दारे होणाऱ्या मशागतीतील प्रत्येक कामाचा दर ठरविला आणि ग्रामपंचायतीमध्ये लावला. त्यामुळे ज्याला कमी किमतीमध्ये मशागत करून हवी असेल तो गावातील शेतकरी नांगरटीसाठी १ हजार २०० रुपयांऐवजी ८०० रुपये दर लावण्यात आला. रोटावेटरसाठी एक हजार रुपयांऐवजी ६०० रुपयेच लागू लागले. परिणामी उत्पादन खर्च कमी झाला. भास्कर पेरे म्हणाले, ‘आपल्याकडे प्रत्येकाला व्यक्तिगत ट्रॅक्टर खरेदी करायचा असतो. त्यामुळे त्याला लागणारे कर्ज, त्यावरील व्याज, इंधनखर्च वाढत जातो. परिणामी शेती परवडत नाही, असे गणित घातले जाते. पण उत्तर कोणी शोधत नाही. ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर एक वाहनचालक नेमला, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी केला. सध्या बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी आमदार निधी देण्याची घोषणा करत आहेत. असे करण्याऐवजी ग्रामपंचायतीसाठी एक किंवा दोन ट्रॅक्टर दिले तरी बरेच काही होईल. पण उत्तरे शोधण्याऐवजी आपल्याकडे प्रश्न विचारणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे.’

कोणी उपाशी झोपणार नाही

गावात कोणी उपाशी झोपणार नाही, याची तजवीज पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली आहे. ज्या व्यक्ती निराधार आहेत, कोणी सांभाळणारा नाही आणि घरात कोणी कमावणारा नाही, अशा वयोवृद्ध व्यक्ती उपाशी झोपणे हे त्या गावच्या सरपंचाचे अपयश असते. त्यामुळे गावातील अशा ३२ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या जेवणाची सोयही ग्रामपंचायतीने केली आहे. त्यासाठी लागणारे किराणा सामान आणि भाजीचा खर्च गावकऱ्यांच्या सहकार्याने उभा केला जातो. गावात कोणी उपाशी झोपणार नाही, ही त्या गावाच्या सरपंचाची जबाबदारी असते. ती निभावण्यासाठी म्हणून हा प्रयोगही केला जात आहे. एका बाजूला पिकणाऱ्यास सहकार्य करायचे आणि दुसरीकडे कोणी भीक मागणार नाही किंवा उपाशी झोपणार नाही, अशी तजवीज करण्यावर भर दिल्याचेही पाटोदा गावाचे सरपंच भास्कर पेरे सांगतात.