दहा दिवसांतील माहिती राज्यमंत्री देसाई यांच्यापुढे सादर

औरंगाबाद : जिल्ह्य़ातून २१ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत ३८ प्राणवायू टँकरची वाहतूक झाली. यासाठी विशेष कॉरिडॉर तयार करून देण्यात आला होता, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना रविवारी येथे देण्यात आली. मंत्री देसाई हे करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी येथे आले होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी मंत्री  देसाई यांच्यापुढे जिल्हाभरात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या कारवाईसह इतर उपाययोजनांची माहिती सादर केली. जिल्ह्य़ातील सर्व २३ पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांद्वारे पथसंचलन करण्यात आले. संचारबंदी-जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस ठाण्यांसह विशेष ०६ भरारी पथकाद्वारे कारवाई करण्यात येत असून त्यांचे विरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहयोगाने दंडात्मक कारवाईही सुरू असून गर्दीच्या तसेच मुख्य बाजारपेठा परिसरात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमांतूनही नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे, असे राज्यमंत्री देसाई यांना सांगण्यात आले. जिल्ह्य़ातील ०६ प्रतिबंधित क्षेत्र, तालुक्यांच्या ठिकाणी नाकाबंदी तर इतर ठिकाणी तपासणी चौकी तयार करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्य़ास लागून असलेल्या ७  सीमा बंद करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनाही संसर्ग होण्याचा धोका ओळखून तातडीचे उपचार मिळण्यासाठी एम.जी.एम. रुग्णालयाशी समन्वय करार करून ५० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी रुग्णालयास ३ लाख रुपयांचे प्राणवायू यंत्रही खरेदी करून दिल्याची माहिती राज्यमंत्री देसाई यांना देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील व सहायक फौजदार जनार्धन बाबुराव मुरमे यांचा पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.