औरंगाबाद : केज तालुक्यातील आडसगावच्या पांडुरंग आत्माराम आगलावे यांची वयाच्या ९०व्या वर्षी करोनापासून दुसऱ्यांदा मुक्तता झाली. निव्र्यसनी राहणे आणि थोडासा व्यायाम ही त्यांची आरोग्यमय जीवनाची द्विसूत्री असल्याचे ते सांगतात.

बहुतांश सर्व वयोगटातील व्यक्तींना करोना संसर्ग होत आहे. अशा काळात पांडुरंग आगलावे हे करोनातून दोनदा मुक्त झाले. पहिल्या लाटेत नोव्हेंबर महिन्यात त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हा १० दिवसांत ते बरे झाले होते. तेव्हा त्यांचा संसर्गही फारसा अधिक नसावा, असे त्यांचा मुलगा सांगतो. दुसऱ्यांदा एप्रिल महिन्यात संसर्ग झाल्यानंतर त्यांना लोखंडी सावरगाव येथील कोविड काळजी केंद्रावर भरती करण्यात आले. नंतर त्रास अधिक वाढल्याने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. अलीकडेच १७ एप्रिल रोजी ते पुन्हा एकदा करोनातून मुक्त झाले असून डॉक्टरांनी त्यांना घरी सोडले आहे. दुसऱ्या वेळी संसर्ग झाला तेव्हा त्यांचा संसर्गाचा गुणांक १३ होता. त्यामुळे बरे होण्यासाठी थोडा अधिक काळ लागला. ताण न घेता निव्र्यसनी आयुष्याबरोबरच थोडासा व्यायाम करत राहिल्यामुळे या विषाणूवर मात करता येते, असे ते सांगतात. रुग्णालयात दाखल झाले होते तेव्हा ९० वर्षांच्या पांडुरंग आगलावे यांचे रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ८५ एवढे होते. प्राणवायू आणि इतर नेहमीच्या औषधांनी ते बरे झाल्याचे डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले,‘ सकारात्मक ऊर्जा असणाऱ्या आगलावे यांच्यावर उपचार करताना १० मिनिटे अधिक खर्च करायचो. कारण मलाही त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळायचे.’