पोलीस असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या दोन तोतया पोलिसांना गुरुवारी औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी नाशिक जिल्हातील आहेत. रियाज अहमद कलीम अहमद आणि फैय्याज अहमद कलीम अहमद अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही भाऊ असून त्यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे राहणाऱ्या योगेश विनायक पयगव्हाण हा शहरातील छावणी बाजार येथे शेळी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. योगेश नेहमी प्रमाणे बाजार भाव जाणून घरी परतत असताना या दोन आरोपींनी आरोपींनी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस असल्याचे सांगत त्याला अडवले. तू तुझ्या मालकाचे पैसे घेऊन पळून जात आहेस, त्यांनी तुझ्या नावाची तक्रार गुन्हे अन्वेषण विभागाला दिली आहे, असा दम भरला. त्यानंतर घाबरलेल्या योगेशने स्वतःजवळील आधारकार्ड दाखवत शेळी खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी त्याला बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी योगेशने आरडाओरड केला. त्यामुळे याठिकाणी परिसरातील नागरिक जमा झाले. योगेशने घडलेल्या घटनेची माहिती नागरिकांना दिली.

नागरिकांमध्ये साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी रियाज व फैय्याजला ताब्यात घेऊन क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनी पोलीस असल्याचे सांगून आपण लोकांची फसवणूक करत असल्याचे कबूल केले. पोलिसांनी तात्काळ दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.