मुलामुळे यावे लागले रस्त्यावर 

रात्रीचे अकरा वाजलेले.. महामार्गावर भररस्त्यात झोपी गेलेली वृद्ध महिला पाहून दोन तरुण थबकले. चौकशी केली असता केवळ सोनाबाई एवढंच नाव सांगून मुलाने सगळी कागदपत्रे जाळून टाकल्याची माहिती वृद्धेने त्या तरुणांना दिली. तरुणांनी रस्त्यावर आलेल्या आजीविषयीची माहिती समाज माध्यमावर टाकली आणि अवघ्या दोन दिवसांत आजीस चिखलीत आधार मिळाला आहे.

जिल्ह्यतील उमरगा चौरस्ता महामार्गावर १८ मे रोजी रात्री एक वृद्ध महिला भररस्त्यात झोपी गेलेली असल्याचे खुशी फाऊंडेशनचे सुमित गावडे व देवानंद जाधव यांच्या निदर्शनास आले. वृद्धेची अवस्था पाहून त्यांनी जवळ जाऊन विचारपूस केली. सोनाबाई गायकवाड असे नाव असलेल्या या आजीकडून पोटच्या मुलानेच सगळी कागदपत्रे जाळून पुरावे नष्ट केले, अशी माहिती समोर आली. अन्य मित्रांच्या मदतीने त्यांनी वृद्धेस रस्त्यावरील एका घराच्या आडोशाला रात्रीपुरता आश्रय दिला. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ती आढळून आली नाही. घरमालकाने आपल्या घरासमोर अशी स्त्री नको म्हणून तिला हुसकावून लावल्याचे समजल्यानंतर या तरुणांनी शोध घेऊन रूरुग्णवाहिकेतून तिला लातूरला नेऊन तेथे उपचार केले. दरम्यान, वृद्ध आजीची कायमस्वरूपी निवासी आश्रमात व्यवस्था करण्यासाठी समाजसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आले. त्यास महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी प्रतिसाद देत या वृद्ध आजीच्या निवासाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली. मात्र तिच्या नावाची कोणतीही कागदपत्रे जवळ नसल्याने आश्रमात ठेवण्यात अडथळा आला. दरम्यान, चिखली (बुलढाणा) येथील अनाथ, मतिमंद, बेवारस, मनोरुग्ण, कुष्ठरुग्णांसाठी प्रकल्प चालविणाऱ्या सेवा संकल्पच्या आरती व नंदकुमार पालवे दाम्पत्याने आजीला आमच्याकडे घेऊन या, असे सांगितले. अखेर २० मे रोजी सेवा संकल्पमध्ये वृद्धेस सोडण्यात आले. तेथे या नव्या आजीची ओवाळणी करून ‘आश्रमाची सोनामाय’ असे नामकरण करण्यात आले. त्यामुळे या आजीला आता निवारा मिळाला आहे. या कामी सुमित गावडे, देवानंद जाधव, मधुकर सोनवणे, वर्षां सोनवणे, कुणाल रामढवे आदींनी परिश्रम घेतले.