दुष्काळग्रस्त भागातील अतिगरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून (शुक्रवार) औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. काही जलतज्ज्ञांसमवेत त्यांची बठकही होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद, उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातील अतिगरीब शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये व अन्नधान्य वितरण केले जाणार आहे.
दुपारी औरंगाबादेत आगमन झाल्यानंतर शिवजलक्रांती योजनेच्या अनुषंगाने काही बठका होणार आहेत. फुलंब्री व खुलताबाद येथे शनिवारी शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जाणार आहे. हा कार्यक्रम अधिक नीटपणे व्हावा, या साठी शिवसेनेचे मंत्री व संबंधित पालकमंत्री मराठवाडय़ात ठाण मांडून बसले होते. औरंगाबाद जिल्ह्यात अतिगरीब शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. सरकारी यंत्रणेने केलेल्या या सर्वेक्षणाच्या निकषावरून काही अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होते. मात्र, आता एक हजारजणांची यादी मदतपात्र करण्यात आली. त्यांना उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मदतीचे वितरण होणार आहे. खरे तर उस्मानाबाद, लातूर व बीड या तीन जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. मात्र, औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रथमत: मदतीचे वाटप केले जात आहे. लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. मात्र, तो कार्यक्रम कधी होईल, हे नंतर ठरेल असे सांगण्यात आले. मदतीच्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी पदाधिकारी, कार्यकत्रे यांच्या बठका घेतल्या.