|| सुहास सरदेशमुख
औरंगाबाद :  केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करून अधिकार कक्षा वाढविल्यानंतर नेतेपण आपोआप विकसित होते या भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांच्या धारणांना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी अंगार-भंगार घोषणांमधून छेद दिला. त्यामुळे पंकजा मुंडे यांना कार्यकर्त्यांवर डाफरावे लागले. या घटनेमुळे नेत्यांचे पाठीराखे आणि नेतृत्व यामध्ये निर्माण झालेले अंतर प्रकर्षाने पुढे येत असल्याचे दिसून आले. मराठवाड्यातील केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनापासून

जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. यानिमित्ताने मराठवाड्यासारख्या मागास भागात आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय योजनांचा प्रचार केला जाणार आहे. पण योजनांचा आढावा मात्र कोठेही घेतला जाणार नाही. तसे झाले असते तर योजनांमधील त्रुटी दिसून आल्या असत्या. पण भाजपमधील नाराज ओबीसी घटकाला चुचकारण्यातच यात्रेचा अधिक वेळ जात आहे. त्यामुळे ते नव्या नेतृत्वाशी किती जोडले जातात या निकषावर यात्रेचे राजकीय यश मोजले जाऊ शकेल.

डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी पंकजा मुंडे समर्थकांची इच्छा होती. पण अचानक डॉ. कराड यांची वित्त राज्यमंत्री पदी वर्णी लागली आणि समाजमाध्यामातून भाजपच्या नेतृत्वावर टीका सुरू झाली. तेव्हा कार्यकर्त्यांची समजूत घालताना पंकजा मुंडे यांनी केलेले भाषण राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असणारे मतभेद दर्शविणारे होते. आता माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. या त्यांच्या वक्तव्यादरम्यान असणारी शब्दफेक, आशय, दोन शब्द आणि वाक्यांमधील न बोललेला मजकूर कार्यकर्त्यांनी पकडला आणि मग ते अभिव्यक्त झाले. वित्तमंत्री डॉ. कराड यांच्या समोरील अंगार- भंगारच्या घोषणा हा नेत्यांच्या वर्तणुकीचा कार्यकर्त्यांनी लावलेला अर्थ होता. दुष्काळातील मागण्यांच्या अनुषंगाने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आंदोलन करायची घेतलेली भूमिका नंतर पंकजा मुंडे यांना पक्षांच्या नेत्यामुळे बदलावी लागली. संघर्ष हा शब्द पक्षांतर्गत अधिक वापरावा लागतो आहे, असा संदेश त्या आवर्जून देत होत्या. त्यामुळे कार्यकर्ते समाजमाध्यमातून व्यक्त होत.  या वेळी जाहीरपणे ते केंद्रीय नेत्यांसमोर ‘ अंगार- भंगार’ पद्धतीने व्यक्त झाल्याने पंकजा मुंडेंची कोंडी झाली. ती कोंडी वाढत जाऊन केंद्रीय नेतृत्त्वापर्यंत तक्रारी होतील असे वाटून त्या कार्यकर्त्यांवर डाफरल्याचे विश्लेषण भाजपमधील ज्येष्ठ कार्यकर्ते करू लागले आहेत.

पाठीराखे असणे आणि कट्टर कार्यकर्ते असा भेद भाजपमधील इतर नेते आणि मुंडे समर्थक यांच्यामध्ये पूर्वीपासून होता. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतीत ते सर्वांना सहन होणे शक्य होते. कारण पक्षासाठी त्यांनी खस्ता खालल्या होत्या. पण तोच तोरा आणि तीच पद्धत त्यांच्याही वारसाकडून अनुसरली जावी आणि ती पक्षाने स्वीकारावी यातून निर्माण झालेल्या पक्षांतर्गत वादात आता अंगार- भंगार घोषणेची भर पडली आहे. अर्थात ही घोषणा पंकजा मुंडे यांनी थांबवली असली तरी नव्याने केंद्रात मंत्री झालेल्या कराड यांचे लगेचच कट्टर समर्थक बनतील अशी शक्यता कमी आहे. मराठवाड्यातील भाजप नेत्यांमध्ये सर्वाधिक पाठीराखे पंकजा मुंडे यांना आहेत हे खरेच पण त्या समर्थकांनी डॉ. कराड यांना स्वीकारण्यासाठी त्यांनाही खासे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांचा सत्ताधारी म्हणून आतापर्यंतच अनुभव महापालिकास्तरावरचा होता. आता त्यांना थेट केंद्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे धोरणे ठरविताना मागास भागांसाठी त्यांना स्वतंत्र धोरणे आखावी लागली. त्या धोरणांच्या आधारे आणि नव्या योजनांच्या आधारे कार्यकर्ते आणि समर्थक मिळवावे लागतील. कारण डॉ. कराड यांचा पिंड भाषणातून गर्दी खेचणाऱ्यांचा नाही. तरीही त्यांची यात्रा आता सुरू झाली असून मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात ती जाणार आहे. नेतृत्व विकसित करण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ठरविलेली यात्रेची कार्यपद्धत कार्यकर्ते स्वीकारतील की नाही हे लवकरच कळेल पण निमित्ताने अंगार- भंगारच्या घोषणा आणि त्याला रोखल्याने पंकजा मुंडे पक्षशिस्तीला अधिक महत्त्व देऊ लागल्याचा संदेश मात्र अधोरेखित झाला आहे.