लोअर दुधना प्रकल्पातून लातूरला रेल्वेने अतिरिक्त पाणी देता येईल का, याची चाचपणी पूर्ण झाली असून येत्या १५ ते १७ दिवसांत रेल्वे मंत्रालयाकडून आणखी एक रेल्वे मिळाल्यास अतिरिक्त पाणी देण्याचा विचार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. मात्र, ही मागणी अंमलबजावणीत आणता येणार नाही, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. एकाच मुद्दय़ावर दोन मंत्री वेगवेगळी विधाने करत असल्याचे शनिवारी दिसून आले. मात्र, ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. कारण हा प्रस्ताव आजच्या बैठकीतच मांडला गेला. त्यामुळे याची माहिती कदाचित जलसंपदा मंत्र्यांना नसेल. मात्र, लोअर दुधनामधून अतिरिक्त पाणी देता येऊ शकेल, असा दावा खडसे यांनी केला.
लोअर दुधना प्रकल्पातून लातूर शहराला पाणी देता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात आली होती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी या अनुषंगाने काही दिवसांपूर्वीच बोलणे झाले होते. त्यांनी अतिरिक्त रेल्वे उपलब्ध होऊ शकते, असे सांगितलेले आहे. येत्या १५ ते १७ दिवसांत अशी रेल्वे उपलब्ध झाल्यास परतूर येथून पाणी उचलून रेल्वेपर्यंत नेण्यासाठी ६०० मीटरची जलवाहिनी टाकावी लागणार आहे. त्यासाठी २ कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तो मंजूर होईल, असे सांगत खडसे यांनी परतूर येथून पाणी पाठविण्याची व्यवस्था होईल, असे सांगितले. तत्पूर्वी गिरीश महाजन यांना या प्रकरणी प्रश्न विचारला असता, तसा काही विचार नाही आणि ते शक्य नाही, असे उत्तर त्यांनी दिले होते.