देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवले जात असताना औरंगाबादमधील जिल्हा परिषदेची शाळा अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहे. याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. औरंगाबादपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोपाळपूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक कचरा डेपोमुळे हैराण झाले आहेत. शाळेच्या इमारतीच्या पाठीमागील बाजूतील ४६ एकर परिसरात शहरातील कचरा टाकला जातो. या कचऱ्याचे तीस ते पस्तीस फुटापर्यंत उंच डोंगर तयार झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी भटकी कुत्री, माशांचे थवे आणि दुर्गंधीचे वातावरण असते. शाळा आणि कचरा डेपोमधील अंतर शंभर मीटर पेक्षाही कमी आहे. परिणामी हवेची झुळूक आली की, शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरते, असे या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका स्वाती केतकर यांनी सांगितले. सकाळी प्रार्थनेच्यावेळी कचरा डेपोकडून हवेची झुळूक आली की विद्यार्थ्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागतो.  विद्यार्थ्यांना सर्दी, ताप, खोकला, त्वचा आणि श्वसनाचे आजार होत असल्याचेगी केतकर यांनी सांगितले.

शाळेतील आरोग्य तपासणी शिबिरात कचरा डेपोमुळे मुलांच्या आजारात वाढ होत असल्याचे समोर आले. या समस्येमुळे शाळेच्या पटसंख्येवरही परिणाम झालाय. ही शाळा ज्यावेळी गावात भरायची त्यावेळी १८० विद्यार्थी यायचे. मात्र, सध्याच्या घडीला फक्त ११० विद्यार्थांची नावे पटावर दाखल झाली आहेत. यातील दोन मुलं आजारपणामुळे सतत गैरहजर राहतात. मांडकी गावच्या शिवारात असलेला हा कचराडेपो नारेगावचा कचराडेपो म्हणून ओळखला जातो.  १९८४ पासून मांडकी गावाच्या गायरान जमिनीवर कचरा टाकला जात आहे. सुरुवातीला चाऱ्या खोदून त्यात कचरा टाकला जायचा. तो कचरा विघटित झाला की, परिसरातील शेतकरी शेतीसाठी खतं म्हणून घेऊन जायचे. मात्र, काही दिवसांपासून कचऱ्यात प्लॅस्टिक, दवाखान्यातील औषधांच्या बाटल्या, इंजेक्शनच्या सुया याचे प्रमाण वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कचरा घेऊन जाणे बंद केले.

municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

सध्या दररोज ३०० ते ४०० गाड्या भरुन कचरा या ठिकाणी टाकला जातो. सुरुवातीला सत्यम फर्टिलायझर या कंपनी कचऱ्यापासून खतनिर्मिती करत होती. मात्र, काही दिवसांतच त्यांनी गाशा गुंडाळला. त्यानंतर कचऱ्यापासून गॅस निर्मितीसाठीचा प्रकल्प राबवण्यात आला. संपूर्ण कचऱ्याच्या ढिगाची माती होण्यासाठी रसायन फवारण्यात आले. परंतु, सगळ्या प्रकल्पात फक्त सरकारी पैशाची माती झाली. आज कचऱ्यामुळे परिसरातील वातावरण दूषित झालं आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील गावकरी कचरा डेपो हटवण्यात, यावा यासाठी आंदोलन छेडणार आहेत. आता गावात राहू नाहीतर जेलमध्ये जाऊ असा निर्धारच परिसरातील गावकऱ्यांनी केला आहे.