लातूर शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मे महिन्यात लातूरला रेल्वेने पाणी देण्याची प्रशासनाची तयारी सुरू झाली असून, तापी नदीतील हतनूर, नगर जिल्हय़ातील मुळा व उजनी धरणातून रेल्वेने पाणी आणण्याच्या पर्यायाचा विचार केला जात आहे.
तापी येथील हतनूर धरणातील पाणी भुसावळ, जळगाव परिसरात दिले जाते. हे पाणी रेल्वेने लातूरला आणता येईल काय? याची चाचपणी सुरू होती. मात्र, जेमतेम पावसाळय़ापर्यंत त्या परिसराला पुरवता येईल इतकेच पाणी उपलब्ध असल्यामुळे लातूरकरांना हे पाणी देणे गरसोयीचे असल्याचे तेथील मंडळींचे म्हणणे आहे. तापीतील पाणी लातूपर्यंत पोहोचणे तापदायक असल्याचे सांगण्यात येते.
नगर जिल्हय़ातील मुळा धरणातून नगर, नेवासे व आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा होतो. या धरणात मृत साठय़ासह ७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. १५ जुलपर्यंत हे पाणी त्या परिसरास पुरवता येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. अगदीच बाका प्रसंग ओढवला तर रेल्वेने हे पाणी लातूपर्यंत आणण्याचा पर्याय विचाराधीन आहे.
दरम्यान, उजनीतून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २५ कोटींचा प्रस्ताव विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी मंत्रालयात पाठवला आहे. मे महिन्यात लातूर परिसरातील पाणीसाठा संपुष्टात आला, तर रेल्वेने पाणी देण्याला पर्याय राहणार नाही. उजनीचे पाणी पंढरपूरहून किंवा उजनीजवळच्या रेल्वेस्थानकावरून आणण्याची योजना आखण्यात येत आहे. कमीतकमी पाण्याचा अपव्यय होईल, या पद्धतीने योजना आखली जात आहे. लातूरच्या हरंगुळ स्थानकात रेल्वे थांबण्यासाठी मार्ग तयार करणे वा लातूर रेल्वेस्थानकावरून टँकरने पाणी आर्वी बुस्टरपंप व हरंगुळ येथे शुद्धीकरणासाठी नेणे अशा पर्यायाचाही विचार केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी चार महिन्यांपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे प्रसंग पडला तर लातूरकरांना रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. दरम्यान, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत रेल्वेने लातूरकरांना पाणी पुरवणे खíचक असल्याचे लेखी उत्तरात म्हटल्यामुळे आमदार अमित देशमुख यांनी सरकार लातूरला पाणीपुरवठा करण्यासंबंधी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 cr proposal for water distribution of ujani dam
First published on: 01-04-2016 at 01:20 IST