पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर सादरीकरण

औरंगाबाद : महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या सातारा-देवळाईसह गुंठेवारी भागात टाकण्यासाठी गटार सुविधेसाठी ३८२ कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासोबतच गरवारे स्टेडियमच्या विकासासाठी ५० कोटी रुपये, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाचे नूतनीकरण व संशोधन केंद्रासाठी २५ कोटी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्रासाठी २५ कोटी या प्रमाणे ४८२ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली जाणार आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर या प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ९ सप्टेंबर रोजी जिल्ह्य़ासह शहरातील विविध विकास प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यापूर्वी जिल्हा आणि मनपाकडून सादर केल्या जाणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे सादरीकरण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर शुक्रवारी करण्यात आले. महापालिकेच्या वतीने प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटी आणि मनपातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचे सादरीकरण केले. महापालिकेने सातारा-देवळाईसह गुंठेवारी भागात गटार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.  सातारा-देवळाई भागात गटार योजनेसाठी २३२ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला, तर गुंठेवारी भागासाठी १५० कोटींचा प्रस्ताव तयार केला. हे दोन्ही एकत्रित प्रकल्प राबविण्यासाठी ३८२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून या निधीची मागणी केली जाणार आहे.

गरवारे स्टेडियमच्या विकासासाठी ५० कोटी

सिडकोतील गरवारे स्टेडियमचा विकास करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. गरवारे स्टेडियममध्ये खेळपट्टी तयार करणे, गरवारे स्टेडियम परिसरात जलतरण तलाव उभारणे, बॅटमिंटन हॉल तयार करणे, समोरच्या दोन्ही मैदानापैकी एक मैदानावर फुटबॉल व हॉकीसाठी मैदान तयार करणे आणि समोरच्या मैदानावर लॉन टेनिस कोर्ट उभारणे आदी कामांचे नियोजन आहे. त्याकरिता ५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय

रंगीन दरवाजासमोर महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुराण वस्तू संग्रहालय उभारण्यात आले आहे. या पुराणवस्तू संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यासाठी आणि इतिहास संशोधन केंद्र उभारण्याकरिता २५ कोटींच्या निधीची मागणी केली जाणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्रासाठी २५ कोटी शहरात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे संशोधन केंद्र आणि माहिती जीवनपट निर्मिती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संशोधन केंद्रासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.