सुहास सरदेशमुख

औरंगाबाद शहरातील प्रसार रोखण्यासाठी विषाणूचा पाठलाग करायचा. तो ज्यांच्या शरीरात लपतो आहे, त्यांना शोधण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढवायचा अशी प्रक्रिया हाती घेताना आतापर्यंत ७७ हजार ७७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. जून महिन्यात कमी चाचण्या करून अधिक रुग्ण आढळून यायचे आणि आता जून महिन्याच्या तुलनेत सात पटीने चाचण्या वाढवूनही येणारी रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे चाचण्यांच्या माध्यमातून विषाणूचा पाठलाग करणे ही प्रक्रिया दमछाक करायला लावणारी आहे. सध्या सुरू असणारी प्रक्रिया विनाअडथळा सुरू राहिली तर स्वातंत्र्य दिनापर्यंत म्हणजे १५ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद शहर तुलनेने अधिक सुरक्षित होईल,असा दावा महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडये यांनी केला आहे. दहा दिवसांच्या टाळेबंदीमध्ये आणि त्यानंतर चाचण्यांना वेग देण्यात महापालिका प्रशासनाला यश येत असून सात नव्या कार्यपद्धतीने काम सुरू आहे. दशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांचा हा वेग आता मुंबईशी तुलना करणारा असल्याचा दावाही पांडये यांनी केला आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात लाळेचे सरासरी २५०-३०० नमुने करोना चाचणीसाठी घेतले जात तेव्हा दोनशे रुग्ण दिसून येत. आता चाचण्यांची गती सात पटींनी वाढल्यानंतरही येणारी रुग्णसंख्या तेवढीच म्हणजे २०० ते २५० या दरम्यान आहे. याचा अर्थ करोना विषाणूचा फैलाव काही अंशाने कमी होताना दिसत आहे. याला आणखी एका आकडेवारीचा आधार देता येईल. पूर्वी हिलाल कॉलनी, जलाल कॉलनी, संजयनगर, जयभवानीनगर, भावसिंगपुरा यासह शहरातील १८ भागांत पूर्वी म्हणजे मे- जून महिन्यात रुग्णसंख्या अधिक होती. त्याभागात सरासरी २०० जलद चाचण्या घेतल्यानंतर एकही रुग्ण आढळून आला नाही. वाढती रुग्णसंख्या आणि विषाणूचा पाठलाग करण्यासाठी म्हणून लावण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये एक लाख अन्टीजेन कीट महापालिकेने खरेदी केले. त्यातील ३० हजार कीट वापरण्यात आले आणि दहा दिवसांत २५०० रुग्णांचा शोध घेण्यात आला. एका बाजूला विषाणूचा पाठलाग करताना वयोवृद्ध व्यक्तीची काळजी घेतली जात आहे.

नवे अ‍ॅप विकसित

महापालिकेच्या वतीने ‘माझी हेल्थ माझ्या हाती’- ‘एमएचएमएच’ हे अ‍ॅप विकसित करण्यात आले. यामध्ये ९८ हजार जणांची माहिती भरण्यात आली असून त्यावर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येते. दोन डॉक्टर आणि दहा परिचालक दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकृतीमध्ये बदल होत आहेत काय, याची विचारणा करतात. हे सारे सुरू असतानाच शिक्षक, प्राध्यापक मंडळी घरोघरी जाऊन तपासणी केली जाते. असे फिरते हजार पथक काम करत आहेत.

टाळेबंदीमध्ये बाजारपेठ आणि उद्योग सुरक्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजी, दूध, चिकन, मटण, अंडी, दूध आणि केशकर्तनालयातील व्यक्तींच्या चाचण्या करण्याचे ठरविण्यात आले. आणखी दोन दिवस या चाचण्या होतील. आतापर्यंत २० हजार जणांच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. केवळ विक्रेते नाही तर उद्योगही सुरक्षित व्हावे म्हणून कंपनीतील कामगारांच्या तपासणीही सुरू करण्यात आली आहे. सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची ही गती कायम ठेवताना मात्र खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. गेली चार महिने यंत्रणा रोज अतिरिक्त ताणात काम करते आहे. त्यांचे मनोधैर्य वाढवायला हवे.

केंद्र उभारणीसाठी उद्योजकांकडून निधी

गेली काही दिवस करोना फैलाव रोखण्यात फारशी गती नव्हती. मात्र, दहा दिवसांची टाळेबंदी लावल्यानंतर ही समस्या आम्ही सोडवायला मैदानात उतरलो आहोत, असा संदेश देण्यात महापालिका प्रशासनाला यश येत आहे. आता शहरातील व औद्योगिक व्यावसायातील ७० हजार कामगारांची तपासणी मोहीम सुरू झाली असून काही कोविड काळजी केंद्र उभी करण्यासाठी लागणारा निधीही उद्योजकांकडून दिला जाणार आहे.

जून महिन्यातील या पाच दिवसांत होणाऱ्या चाचण्यांची संख्या दोनशे ते दोनशे पन्नास होती आणि रुग्णसंख्या किमान ५८ आणि कमाल ९८ एवढी होती. चाचण्या कमी असताना अधिक रुग्णसंख्या आणि चाचण्या कमी झाल्यानंतर कमी रुग्णसंख्या असा आलेख दिसून येत आहे. त्यामुळे विषाणूचा पाठलाग करण्याचे धोरण पुढील काही दिवस वेगाने सुरू राहील.

चाचण्यांना वेग:  दहा दिवसांच्या टाळेबंदीमध्ये आणि त्यानंतर चाचण्यांना वेग देण्यात महापालिका प्रशासनाला यश येत असून सात नव्या कार्यपद्धतीने काम सुरू आहे.  चाचण्यांचा हा वेग आता मुंबईशी तुलना करणारा असल्याचा दावाही महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडये यांनी केला आहे.

एकाच वेळी सात पद्धतीने काम करतो आहोत. पण सध्या विषाणूचा पाठलाग करायचा. त्याला शोधायचे, तो रुग्ण कोविड काळजी केंद्रात आणायचा. त्याच्या संपर्कातील जोखमीचे आणि अधिक जोखमीच्या व्यक्ती शोधायच्या पद्धतीबरोबरच शहरातील विक्रेते आणि उद्योग सुरक्षित राहिले पाहिजेत अशी मोहीम सुरू केली आहे. शिवाय उद्योजकांनी त्यांच्या कामगारांच्या चाचणीसाठी कीटसाठी अर्थसहाय्य दिले आहे. त्यामुळे त्यांच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. विक्रेते आणि उद्योजक सुरक्षित झाले तर फैलाव काहीसा कमी होईल.

– अस्तिककुमार पांडये, महापालिका आयुक्त