छत्रपती संभाजीनगर : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये सरकार कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही, असा संदेश गेल्याने राज्यात पवन ऊर्जा क्षेत्रातील ४ हजार २८४ मेगावॉटपैकी २ हजार १५० मेगावॉटचे प्रकल्प धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. यातही सर्वाधिक गुंतवणूक धाराशिव जिल्ह्यात असून, आतापर्यंत ३५८ पवनचक्क्या उभ्या राहिल्या आहेत. १ हजार २०० मेगावॉटचे काम सुरू असल्याची माहिती अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली. धाराशिवमध्ये काही ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पास येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच बैठक घेतल्याचे सांगण्यात आले.

बालाघाटच्या डोंगररांगा पवन ऊर्जा प्रकल्पास पोषक असणारा भाग असल्याचे जाहीर झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात १२ कंपन्यांनी आता १२०० मेगावॉट ऊर्जानिर्मितीचे प्रकल्प हाती घेतले आहेत. एक मेगावॉट उत्पादन घेण्यासाठी साधारणपणे तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार एकट्या धाराशिव जिल्ह्यात तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक हाईल, असा दावा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यापासून बीडच्या सीमेलगत असलेल्या वाशी तालुक्यापर्यंत आणि कर्नाटक सीमेवरील उमरगा तालुक्यापासून नगर जिल्ह्यापर्यंत पवन ऊर्जा प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू आहे.

या आहेत त्या बारा कंपन्या

सुयोग ऊर्जा, एनर्जी इन्फ्रा, जे. एस. डब्ल्यू रीन्यूव्ह एनर्जी-३, जेएसडब्ल्यू रिन्यूव्हेबल एनर्जी (डी), आवदा एनर्जी, रिन्यूव्ह सोलार, रिन्यूव्ह ग्रीन एनर्जी सोल्युशन, रिन्यूव्ह सोलार पाॅवर, सेरेर्टिका रिन्यूव्हेबल इंडिया, सेरेर्टिका रिन्यूव्हेबल इंडिया-४, श्री मारुती विंड पार्क डेव्हलपर्स, टाटा पावर रिन्यूव्हेबल एनर्जी या कंपन्यांनी या जिल्ह्यात गुंतवणूक वाढविली आहे. १२०० मेगावॉट प्रकल्पाची नोंदणी झाली असल्याची माहिती अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हास्तरीय तक्रार मंच

शेतकऱ्यांना जमिनीचे भाडे देताना कंपन्यांकडून शेतकऱ्यांना फसविले जात असल्याच्या आरोपामुळे काही ठिकाणी आंदोलने होत असल्याने राज्य सरकारच्या आदेशान्वये राज्यात जिल्हास्तरीय पवन ऊर्जा संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे मागील सहा महिन्यांत धाराशिव जिल्ह्यात ३०१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, यांपैकी १७५ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर विविध कारणांमुळे १२६ तक्रारी अद्यापही समितीकडे प्रलंबित आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यात पवन ऊर्जानिर्मितीचे मोठे केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काळात या क्षेत्रात आणखी गुंतवणूकदार येत आहेत. या तीन जिल्ह्यांमध्ये तसेच सोलापूरमध्ये सौर प्रकल्प वाढविण्याचा विचारही राज्य सरकार करत आहे.अतुल सावे, अपारंपरिक ऊर्जामंत्री