छत्रपती संभाजीनगर : राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका, मदतनिसांना मिळणारी प्रत्येकी दोन हजार रुपयांची ‘भाऊबीजभेट’ दीपावली सरून पंधरा दिवस लोटल्यानंतरही खात्यावर जमा झालेली नाही. त्यासाठी ‘व्हर्च्युअल पर्सनल डिपाॅझिट अकाऊंट’चे (व्हीपीडिए) तांत्रिक कारण पुढे केले जात आहे. ही प्रणाली सरकारी निधी व्यवस्थापनाची वितरण प्रक्रियेतील असल्याचे प्रशासकीय स्तरावरून सांगण्यात येत आहे. यामध्ये निधीची रक्कम थेट शासनाकडेच जमा असते. मागणीनुसार प्रक्रियेतून गेल्यानंतर मिळते. तर ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्तींसाठी ही काहीशी किचकट प्रणाली असल्याचे अंगणवाडीसेविकांचे म्हणणे आहे.

राज्यात अंगणवाडीसेविका, मदतनिसांची एकूण २ लाख १० हजारांची संख्या आहे. जिल्हानिहाय ही एकत्रित संख्या प्रत्येकी सहा हजारांच्या आसपास आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक ते सव्वा कोटी रुपयांचा निधी पाहता राज्यात ३४ ते ४० कोटी रुपयांची भाऊबीजभेट एकत्रित संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाकडे वितरित करण्यात आली. यातील काही जिल्ह्यांमध्ये भाऊबीजभेट मिळाल्याचा दावा प्रशासकीय स्तरावरून केला जातो. परंतु बहुतांश जिल्ह्यांमधील अंगणवाडीसेविका, मदतनिस भाऊबीजभेटीपासून वंचित असल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३ हजार ४४० अंगणवाडीसेविका असून, तेवढ्याच मदतनिस आहेत. जिल्ह्यासाठी १ कोटी १६ लाख ४४ हजार रुपयांचा निधी १३ ऑक्टोबर रोजीच म्हणजे दिवाळीपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाकडे वितरीत करण्यात आला आहे. यासंदर्भाने एका पत्राद्वारे शासनाने कळवले आहे. या पत्रावर तालुकानिहाय व मोठ्या तालुक्यांसाठी दोन भाग करून उपकोषागार क्रमांक नोंदवण्यात आलेला आहे. १३ ऑक्टोबर २०२५ हे पत्र असून, दिवाळीच्या दहा दिवस आधीच रक्कम मिळालेली असतानाही अद्यापही ही भाऊबीजभेट अंगणवाडीसेविका, मदतनिसांना मिळालेली नाही.

भाऊबीजभेट वितरित करण्यामध्ये व्हीपीडीए प्रक्रियेतून जावे लागते. जिल्हा कक्ष, लेखा व वित्त अधिकारी, तेथून डीएटी विभाग, अशा मंजुरीच्या प्रक्रियेत जाऊन ही रक्कम अंगणवाडीसेविका, मदतनिसांच्या खात्यावर जमा होणार आहे. यातील बरीच प्रक्रिया पुढे गेलेली असून, जिल्हा कक्षाकडूनही मान्यता मिळालेली आहे. तांत्रिकबाजूंची पूर्तता झाली की भाऊबीजभेट जमा होईल. – मंगल पांचाळ, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण.

भाऊबीजभेटीचा ‘शिमगा’ चालतो

दरवर्षीच शासनाकडून अंगणवाडीसेविका, मदतनिसांना देण्यात येणाऱ्या भाऊबीजेच्या भेटीत घोळ घातला जातो. कधीच दिवाळीच्या भाऊबीजेपर्यंत खात्यावर रक्कम जमा होत नाही. तांत्रिक घोळ घालून शिमग्यापर्यंतचा वेळ जातो. त्यानंतर ही रक्कम मिळते. यंदा व्हर्च्युअल पर्सनल डिपाॅझिट अकाऊंटसारखी विचित्र पद्धत आणलेली आहे. राज्यात अंगणवाडीसेविका, मदतनिसांची संख्या २ लाख १० हजार एवढी आहे. – काॅ. शुभा शमीम, अध्यक्ष, सिटू प्रणित संघटना.