छत्रपती संभाजीनगर : जागतिक भूक अहवाल सांगतो, की दररोज २४४ कोटी रुपयांचे अन्न वाया जाते. त्यात जेवणातील ताटात खरकटे ठेवल्याने फेकून देण्याची वेळ आलेले अधिक. या विषयीची माहिती देण्यासाठी आलेल्या ‘अन्न वाचवा समिती’च्या सदस्यांना तत्काळ प्रतिसाद देत एका तरुण हाॅटेल व्यावसायिकाने ‘थाळी चकाचक करा, जेवणाच्या देयकात १० टक्के सूट मिळवा’ असे सवलत अभियानच राबवले.
या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. विनयकुमार राठोड, सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे, अन्न वाचवा समितीचे प्रमुख तथा रा. प. महामंडळातील निवृत्त अधिकारी अनंत मोताळे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. तरुण हाॅटेल व्यावसायिक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले, की ग्लोबल हंगर इंडेक्सचा आलेख वाढताना दिसतो आहे. आलेख वाढवण्यात नसले, तरी कमी करण्याच्या दृष्टीने आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने रविवारपासून (२० जुलै) पंजाबी थाळीमध्ये एकही शीत न ठेवणाऱ्या आस्वादकास १० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला. चार दिवसांत अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे. दररोज चार-पाच ग्राहक सवलतीचा लाभ घेत आहेत. आपणही अन्न तंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे पदवीधर असून, उच्चशिक्षित असल्याने अन्न वाचवा समितीने खरकट्याचा मांडलेला मुद्दा कुठे तरी अंतर्मनाला भावल्यानेच तत्काळ सवलत देण्यास सुरुवात केली.
अन्न वाचवा समितीला निमंत्रण
‘अन्न वाचवा समिती’ मागील काही वर्षांपासून शहरात काम करत आहे. तरुण व्यावसायिक प्रवीण लोखंडे यांच्या हाॅटेलला भेट दिल्यानंतर त्यांना जागतिक भूक अहवाल दाखवला. त्यांना खरकटे वाया जात असल्याचा मुद्दा पटला. त्यांनी निर्णय घेत सवलत देण्यास सुरुवातही केली. अन्य हाॅटेलांनीही हे अभियान सुरू केले, तर बरेच वाया जाणारे अन्न वाचेल. समितीला येथील मौलाना आझाद शैक्षणिक संस्थेकडूनही जनजागृतीसाठी २५ जुलै रोजी निमंत्रित केले आहे. – अनंत मोताळे, अन्न वाचवा समिती